कोलकाता / वृत्तसंस्था
शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेत शेतकऱयांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. दिल्लीच्या सीमेवर सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची आणि शेतकऱयांचा आवाज बुलंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचे स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱयांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना टिकैत यांनी केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर टीका केली.
दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून पंजाब-हरियाणासह अन्य राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाबाबत टिकैत यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकारने तयार केलेले कृषीविषयक कायदे शेतकऱयांसाठी घातक असल्याने ते मागे घेण्याची मागणी आंदोलक शेतकऱयांकडून केली जात आहे. केंद्र सरकारशी वारंवार झालेल्या चर्चेअंतीही तिढा न सुटल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्यात आलेले आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलनाचे नेतृत्त्व करत असून विविध संघटनांचाही त्याला पाठिंबा आहे. आता विविध राज्यातील राजकीय नेत्यांचा आणि पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी टिकैत यांनी मोहीम सुरू केल्याचे दिसून येत आहे.
नियमांच्या चौकटीत आंदोलन
कोरोना नियमावलीच्या चौकटीत शेतकरी आंदोलन सुरू असल्याचे टिकैत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढेल अशापद्धतीची कुठलीही मोठी बैठक किंवा सभा आम्ही आयोजित करत नाही. आम्ही सगळेजण कोरोना नियमांचे पालन करुन आंदोलन करत आहोत, असे टिकैत म्हणाले. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या वेळी कोरोनाचा भरपूर प्रसार झालेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अमित शहा यांच्या बैठका झाल्यामुळे करोना पसरल्याचा दावा टिकैत यांनी केला.









