कोरोना काळात लोकांची मदत करण्याचा हेतू
टाकाऊ सामग्रीपासूनही कमाल घडविली जाऊ शकते. इंडोनेशियाच्या एका गावात राहणाऱया व्यक्तीने हे सिद्ध करून दाखविले आहे. या व्यक्तीने घरातील टाकाऊ सामग्री म्हणजेच भांडी आणि जुन्या इलेक्ट्रॉनिक सामग्रीच्या मदतीने एक रोबोटच तयार केला आहे. तसेच याला ‘डेल्टा रोबोट’ नाव ठेवले आहे. इंडोनेशिया सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटला सामोरा जात आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे सातत्याने वाढती रुग्णसंख्या पाहता हा रोबोट तयार करणाऱया 53 वर्षीय असियांतो यांनी रोबोटद्वारे लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला.
घरात तयार करण्यात आलेला हा रोबोट अत्यंत उपयुक्त आहे. हा किटाणूनाशकाच्या फवारणीपासून कोरोना संक्रमणामुळे घरात आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांपर्यंत भोजन पोहोचविण्याचे काम करू शकतो.
राइस कुकरद्वारे शीर
रिमोटद्वारे संचालित होणाऱया या रोबोटचे शीर राइस कुकरद्वारे तयार करण्यात आले आहे. एकदा चार्ज झाल्यावर याची बॅटरी सुमारे 12 तासांपर्यंत चालते. घरात आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांच्या गल्लीमधून हा रोबोट जातो, विलगीकरणात राहत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचून हा रोबोट स्पीकरद्वारे त्यांना ‘हॅल्लो’ म्हणतो आणि भोजन पोहोचविल्याचा संदेश देतो. इतकेच नाही तर बाधित लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थनाही करतो.
कोरोनाचा कहर
डेल्टा रोबोट हा टेम्बोक गेडे गावात निर्माण झालेल्या अनेक रोबोट्सपैकी एक आहे. स्वतःच्या आविष्कारांसाठी प्रसिद्ध हे गा इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया प्रांतात मोडते. हा प्रांत मागील एक महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱया लाटेला तोंड देत आहे. इंडोनेशियात आतापर्यत 38 लाखांहून अधिक बाधित सापडले आहेत. तर 1 लाख 15 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशिया आशियातील कोरोना संकटाचे नवे केंद्र ठरले आहे.









