रशियाच्या पावल्युचेन्कोव्हाशी आज होणार जेतेपदाची लढत
वृत्तसंस्था/ पॅरिस
झेक प्रजासत्ताकची बार्बरा क्रेसिकोव्हा व रशियाची ऍनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हा यांच्यात ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम लढत होणार आहे. पावल्युचेन्कोव्हाने स्लोव्हेनियाच्या तमारा झिदान्सेकचा उपांत्य फेरीत पराभव केला तर जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असणाऱया क्रेसिकोव्हाने ग्रीकच्या 17 व्या मानांकित मारिया साकेरीचा चुरशीच्या उपांत्य लढतीत पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी महिला एकेरीच्या जेतेपदाची लढत होईल.
पेसिकोव्हा ही येथे बिगरमानांकित असून गेल्या पाच वर्षांत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती चौथी बिगरमानांकित महिला टेनिसपटू आहे. तिने साकेरीचे कडवे आव्हान मोडून काढत 7-5, 4-6, 9-7 असा विजय मिळविला. या स्पर्धेच्या महिला एकेरीतील तिचे हे सर्वोत्तम प्रदर्शन असून मागील वर्षी तिने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. सलग सहाव्या वर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच खेळणारी महिला चॅम्पियन बनल्याचे शनिवारी पहावयास मिळणार आहे. ‘युवा खेळाडू असताना कनिष्ठ स्पर्धांत खेळताना मला अशाच प्रकारचा चुरशीचा सामना खेळण्याची इच्छा होती. दोन्ही खेळाडूंना जिंकण्याची समान संधी असणारा आणि दोघांकडून दर्जेदार खेळ होणारा आव्हानात्मक सामना खेळण्याची माझी इच्छा होती, ती या सामन्यात पूर्ण झाली,’ असे क्रेसिकोव्हा सामन्यानंतर म्हणाली. ‘मी जरी पराभूत झाले असते तरी जोरदार फाईट दिल्यामुळे मला त्याचा अभिमानच वाटला असता. खेळात आणि प्रत्यक्ष जीवनातही ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते,’ असेही ती म्हणाली.
क्रेसिकोव्हा महिला दुहेरीतही खेळत असून त्यातही तिने अंतिम फेरी गाठत दुहेरी मुकुट साधण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. दुहेरीत ती सिनियाकोव्हासमवेत खेळत आहे. येथील सामन्यात साकेरीने चौथ्या गेममध्ये सर्व्हिस राखत 3-1 अशी आघाडी घेतली होती. पण पेसिकोव्हाने नंतरचे चार गेम्स घेत 5-3 अशी आघाडी घेतली. साकेरीनेही नंतर सलग आठ गुण घेत तिला 5-5 वर गाठले. पण नंतर दडपणामुळे तिला हा सेट 7-5 असा गमवावा लागला. दुसऱया सेटमध्ये सावरताना साकेरीने 4-0 अशी झटपट आघाडी मिळविली आणि ही आघाडी कायम राखत क्रेसिकोव्हाला मुसंडी मारण्याची संधी न देता हा सेट तिसऱया सेट पॉईंटवर जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये दोघींचा तोडीस तोड खेळ झाला. या सेटमध्ये साकेरीला 5-3 वर असताना सामना संपविण्याची संधी होती. पण क्रेसिकोव्हाने जबरदस्त खेळ करीत 6-5 अशी आघाडी मिळविली. 7-6 वर असताना क्रेसिकोव्हाने तीन मॅचपॉईंट वाया घालविले. साकेरीनेही बिनतोड सर्व्हिसवर दोन गुण वाचवले. एका वाईड गेलेल्या फटक्यावर साकेरीने तक्रार केली, पण रेफ्रीनी तो बरोबर असल्याचे रिप्ले पाहून सांगितले. नंतर क्रेसिकोव्हाने पाचव्या मॅचपॉईंटवर बॅकहँडचा विजयी फटका मारत सामना संपविला. 3 तास 18 मिनिटे हा सामना रंगला होता.
क्रेसिकोव्हाला दुहेरी मुकुटाची संधी
पेसिकोव्हाने कॅटरिना सिनियाकोव्हासमवेत महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठताना उपांत्य लढतीत मॅग्डा लिनेट व बर्नार्डा पेरा यांच्यावर 6-1, 6-2 अशी मात केली. या जोडीला या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. 2018 मध्ये या स्पर्धेत क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हा यांनी दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. जेतेपदासाठी त्यांची लढत 14 व्या मानांकित इगा स्वायटेक व बेथनी मॅटेक सँडस् यांच्याशी होणार आहे. स्वायटेक-बेथनी यांनी इरिना कॅमेलिया बेगू व नादिया पोडोरोस्का यांचा 6-4, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.









