ग्लास्गो-स्कॉटलंड / वृत्तसंस्था
पॅट्रिक स्किकच्या डबल स्ट्राईकमुळे झेक प्रजासत्ताकने येथील युरो चषक साखळी सामन्यात स्कॉटलंड संघाचा 2-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. पहिल्या सत्रात 3 मिनिटांचा खेळ बाकी असताना आणि दुसऱया सत्रात 7 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर असे दोन गोल नोंदवत पॅट्रिकने या लढतीला एकतर्फी स्वरुप दिले. स्कॉटलंडचा संघ तब्बल 23 वर्षांनंतर प्रथमच एखादा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. मात्र, येथे त्यांना विजयापासून लाखो कोस दूर रहावे लागले.
स्कॉटलंडने बॉल पझेशनच्या आघाडीवर 58 टक्के वर्चस्व गाजवले. मात्र, तरी त्यांना अगदी एकही गोल करता आला नाही. हॅम्पडेन पार्कवरील या लढतीत पॅट्रिकने 42 व्या मिनिटाला हेडरवर पहिला गोल केला. यामुळे पहिल्या सत्राअखेर झेककडे 1-0 अशी आघाडी होती. त्यानंतर दुसऱया सत्रात गोलरक्षक खूप पुढे आल्याचे लक्षात घेत पॅट्रिकनेच 49.7 यार्डावरुन गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. युरो स्पर्धेत इतक्या लांब अंतरावरुन एखाद्या खेळाडूने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेण्याचा हा 1980 नंतरचा पहिलाच प्रसंग ठरला.









