ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी आणि सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने आपले नाव बदलले आहे. फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यांनी नव्या नावाची घोषणा केली असून, फेसबुक आता मेटा या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकने रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने नावामध्ये हा बदल केला आहे.
कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना झुकरबर्गने सांगितले की, आता कंपनी जी कामं करतेय ते फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आपण मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत आहे. फेसबुकचं नवं नाव मेटा असेल. मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो.
सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उप कंपन्या आहेत. यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि अॅपची नावं बदलली जाणार नाहीत असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे.









