वार्ताहर / झुआरीनगर
झुआरीनगरातील मुख्य बाजारातील एका हॉटेलसह अन्य चार दुकानांना तसेच दोन दुचाकी वाहनांना आग लागण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेत जवळपास 37 लाखांचे नुकसान झाले आहे. पाचही दुकानांना आगीची जबदस्त झळ बसली. आगीचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही. अग्नीशामक दलाने जवळपासची इतर मालमत्ता वाचवली.
स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगीची ही घटना मंगळवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे अग्नीशामक दलाला माहिती देण्यात आली. या आगीत हॉटेल तसेच दारू विक्रीच्या दुकानाचे बरेच नुकसान झाले. ही आग या हॉटेलला लागून असलेल्या एका टायर व किराणा दुकानालाही लागली. या हॉटेलसमोर पार्क केलेल्या दोन दुचाक्याही आगीत खाक झाल्या. अग्नीशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आजुबाजुची मालमत्ता वाचवण्याचे कार्य केले. मात्र, हॉटेल आणि दारू विक्रीचे दुकान खाक झाले. झुआरी कंपनीच्या अग्नीशामक दलानेही बचाव कार्य केले. वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलही घटनास्थळी दाखल झाले. या आगीच्या घटनेत 25 आपले पंचवीस लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा दावा हॉटेल मालक विनोद कुमार गोपीनाथ यांनी केला आहे. जळालेली इतर मालमत्ता लक्षात घेतल्यास नुकसानीचा आकडा सुमारे 37 लाख रूपये आहे. जळालेल्या पाच दुकानांमध्ये हॉटेल, किराणा मालाचे दुकान, टायर दुरूस्तीचे दुकान, वृतपत्र विक्रीचे दुकान व दारू विक्रीचे दुकान यांचा समावेश आहे. शिवाय एक ऍवियटर व स्प्लेंडर अशा दोन दुचाक्याही जळून खाक झाल्या. ही आग कशी लागली याबाबत निश्चित माहिती उघड झालेली नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भागात मध्यरात्रीही काही जण फिरत असतात. त्यासाठी पोलीस गस्तीची आवश्यकता असल्याचे मत स्थानिक पंच कविता कमल यांनी व्यक्त केले आहे.









