योगी सरकारकडून नावात बदल
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने आणखी एका रेल्वेस्थानकाचे नाव बदलले आहे. आता झाशी रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई’ असे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर यासंबंधीचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. यापूर्वी योगी सरकारने आपल्या कार्यकाळात फैजाबादचे अयोध्या, अलाहाबादचे प्रयागराज, मुघलसराय ते दीनदयाल उपाध्याय नगर अशी शहरांची नावे बदललेली आहेत. आता फरक म्हणजे सरकारने शहराऐवजी रेल्वेस्थानकाचे नामकरण केले आहे. सरकारचा हा निर्णय निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
झाशी रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्यात यावे, असा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी गृह मंत्रालयाला देण्यात आला होता. आता हाच प्रस्ताव स्वीकारत योगी सरकारने झाशी रेल्वेस्थानकाचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वेस्थानक केले आहे. रेल्वे स्थानकाचा कोडही आता बदलण्यात येणार आहे. स्थानकाचे नाव बदलूनही या परिसरात पर्यटनाच्या शक्मयता वाढू शकतात, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने केला जात आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभी होणाऱया विधानसभा निवडणुकीत बुंदेलखंड परिसरात याचा फायदा मिळू शकेल.









