ऑनलाईन टीम / रांची :
देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यातच आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात मुख्यमंत्री सोरेन यांनी 18 ते 45 वयोगटातील सुमारे एक कोटी 57 लाख लोकांना मोफत लस देण्याची विनंती केली आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, राज्यातील 18 वर्ष ते 45 वर्षांपर्यंत वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 1100 कोटी खर्च आहे. आणि सध्या कोरोना संसर्गाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या झारखंडला लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या 1100 कोटी रुपयांची तरतूद करणे शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यासोबतच 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लस उपलब्ध होताच एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गरज भासू शकेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत लसींचा पुरवठा हे सर्वात मोठे आव्हान ठरते आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या झारखंडसाठी आपल्या अपुऱ्या मिळकतीतून इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करणे कठीण जाईल, अशी अडचणही सोरेन यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.









