ऑनलाईन टीम / पुणे :
गानवर्धन संस्थेतर्फे शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबियांना कै. स्वरगंधा टिळक स्मृती सांगितिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी कळवली आहे.
शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी, संध्याकाळी 5.00 वाजता, टिळक स्मारक मंदिर सभागृहात सिम्बाॅयोसीस शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमुख पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप अाहे. कराड येथील निवृत्त प्राध्यापक नारायणराव टिळक यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी गायिका स्वरगंधा टिळक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुरुस्कृत केला आहे.
यावेळी भारतातील विविध ठिकाणी असलेले त्यांच्या कुटुंबातील सतारवादक रईस खान, हाफीज बाले खान, छोटे रहिमत खान, रफीक खान, शफीक खान, मोहसिन, कन्या रुकैया आणि नात माध्यमी हे सर्व कलाकार एकत्र येणार आहेत. हे सर्व कलाकार ‘सतार संध्या’ ह्या कार्यक्रमात एकत्रितपणे सतार वादन करणार आहेत. यावेळी तबल्याला पांडुरंग पवार साथ संगत करणार आहेत.