65 वर्षाच्या वर नवी सुविधा नाही : योग्य वयात घ्या आरोग्य विमा : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन विशेष : सुभाष थरवळ,विनय पंराजपे फोटो नावाने
प्रतिनिधी / रत्नागिरी
देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. शासन कोरोना प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक शासनाने घालून दिलेले निर्बंध कटाक्षाने पाळत आहोत. 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठांच्या हालचाली नियंत्रित करण्यात आल्या आहेत. याचवेळी मेडिक्लेम पॉलिसीसाठी विविध विमा कंपन्यांनी हात आखडते घेतल्याने ज्येष्ठ नागरिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहोत. कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये मृत्यू झालेल्या 85 टक्के व्यक्तींचे वय 65 च्या पुढे आहे, असे आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या या आजारावरील खर्चाचे काय, हा प्रश्न उभा राहिला आहे. माझ्यासह अनेकांच्या मेडिक्लेम पॉलिसी आहेत. त्या पॉलिसीला रुपये 1.50 लाखांचा विमा कवच आहे. त्यामध्ये माझी इच्छा व आर्थिक स्थिती असूनही वाढ करु शकत नाही. दुसरी महत्वाची बाब, वय वर्षे 65 वरील कोणाही व्यक्तीला भारतातील कोणतीही विमा कंपनी विमा कवच (पॉलिसी) नव्याने देत नाही. याचाच अर्थ असा की, 65 वर्षावरील कोणाही ज्येष्ठ नागरिकाची मेडिक्लेम पॉलिसी नसेल त्याला आता नव्याने उद्भवलेल्या कोरोना आजारावरील खर्चाचा परतावा मिळणार नाही. म्हणजेच तो खर्च त्याने स्वनिधीतून करावयाचा आहे. 65 वर्षे वयाची मर्यादा घालताना केंद्र शासनाने व केंद्र शासन नियंत्रित विमा कंपन्यानी कोणता निकष लावला आहे, याचा अर्थबोध होत नाही.

विमा कवच मिळण्यास ज्येष्ठांना का नाकारले जाते?
विमा कवच मिळवण्यास 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना का नाकारले जात आहे, 65 वर्षावरील नागरिक जीवित असेपर्यंत मतदान करण्यास पात्र आहे तर कोणत्याही अन्य आर्थिक व वैद्यकीय लाभापासून आणि तो ही स्वतःच्या विमा कवचाची मागणी करणाऱया त्यांना का वंचित ठेवले जाते, असा सवाल सुभाष थरवळ यांनी केला आहे.
गरज नसताना पॉलिसी घ्यायला हवी
विमा शास्त्रामध्ये असे म्हटले आहे, जेव्हा गरज नाही तेव्हा पॉलिसी घ्यावी आणि गरज पडल्यावर त्याचा वापर करावा. शास्त्राच्या आधारे देशातील सर्व विमा कंपन्यांनी 60 वर्षाच्या पूर्वी पॉलिसी घेण्याची मुभा ठेवली आहे. ती लोकांनी घ्यावी. 65 वर्षानंतर नवीन मेडिक्लेम पॉलिसी देण्याची मात्र तरतूद नाही.
विनय परांजपे
शाखा व्यवस्थापक, ओरिएंटल इश्युरन्स कंपनी









