- जनसेवा फौंडेशनचा उपक्रम
ऑनलाईन टीम / पुणे :
जनसेवा फौंडेशनतर्फे दरवर्षी विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने दिनांक 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येतो. यंदा कोविड 19 च्या संसर्गामुळे हा दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार असून यानिमित्त दिनांक 1 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरीक दिना निमित्त जनसेवा फाैऊंडेशनतर्फे आर.आर.टी.सी, केंद्र सरकारचा सामिजीक न्याय व सबलीकरण मंत्रालयातर्फे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर सिनिअर सिटीझनच्या उपक्रमांतर्गत, सामाजिक विभाग महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, भारती योग संस्थान, नवचैतन्य हास्य योग, एकता परिवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, आयएलसी इंडिया, आईस्कॉन, फेसकॉम, एस्कॉप आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहकार्याने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संघाच्या महासचिव डाॅ. जेन बॅरेट, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डाॅ. नीना रैना उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रसिद्ध उद्योगपती नितीनभाई देसाई, राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डाॅ. नरेंद्र जाधव, उद्योजिका अनु आगा, जागतीक आरोग्य संघटनेचे माजी संचालक डाॅ. गुरुराज मुतालीक, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर, इमेरिटचे अध्यक्ष डाॅ. विनोद कुमार, आईस्काॅपचे अध्यक्ष इंदर मोहन भल्ला आणि 106 वर्षांच्या करोना योद्ध्या आनंदीबाई पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या संपूर्ण सप्ताहात ज्येष्ठ नागरिकांना वैचारीक मार्गदर्शन सत्रांसह करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद देखील घेता येणार आहे. तसेच नवचैतन्य हास्य योग, भारतीय योग संस्था, फेसकाॅम अशा विविध संस्थांतर्फे ज्येष्ठांच्या मानसिक प्रसनत्तेसाठी वैविध्यपूर्ण सत्रे होणार आहेत.








