वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन :
अमेरिकेत पोलिसांच्या हातून मारला गेलेला कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड कोरोनाबाधित होता. शवविच्छेदन केल्यावर ही माहिती समोर आली आहे. मृत्यूवेळीही जॉर्ज संक्रमित होता, परंतु त्याच्यात कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती. फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर सुरू झालेली निदर्शने अद्याप थांबलेली नाहीत. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासाच्या बाहेर निदर्शकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला नुकसान पोहोचविले आहे.
अमेरिकेतील पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. फ्लॉयडच्या मृत्यूमुळे संतप्त निदर्शकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला रंग फासला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनी याप्रकरणी आमची माफी मान्य करावी असे म्हटले आहे.
अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर समाजाला विभागण्याचा आणि अधिकारांचा गैरवापर करण्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण ट्रम्प यांनी ज्याप्रकारे हाताळले ते पाहता भीती वाटत असल्याचे मॅटिस म्हणाले. मॅटिस यांनी 2018 मध्ये संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सीरियातून सैन्य माघारीच्या ट्रम्प यांच्या घोषणेमुळे नाराज होत मॅटिस यांनी हा निर्णय घेतला होता. अटलांटिका नियतकालिकात लेख लिहून मॅटिस यांनी कडाडून टीका केली आहे.
नागरिकांना एकजूट करण्याचा न प्रयत्न करणारे मी पाहिलेले पहिले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरले आहेत. किंबहुना ट्रम्प यांनी नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे मॅटिस म्हणाले. मॅटिस यांच्या या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी त्यांना ‘अहंकारी जनरल’ संबोधिले आहे. मॅटिस यांनी मंत्रिपदाचा त्याग केल्याने आनंदच झाल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले आहे.









