तिसऱया दिवसअखेर इंग्लंडची 7 बाद 258 धावांपर्यंत मजल, स्टोक्सचेही आक्रमक अर्धशतक
सिडनी / वृत्तसंस्था
जॉनी बेअरस्टोचे (140 चेंडूत नाबाद 103) शानदार शतक व बेन स्टोक्सच्या (91 चेंडूत 66) दमदार अर्धशतकामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी 7 बाद 258 धावांपर्यंत मजल मारत मालिकेत प्रथमच थोडाफार प्रतिकार नोंदवला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 8 बाद 416 धावांना उत्तर देताना इंग्लिश संघ अद्याप 158 धावांनी पिछाडीवर आहे. बेअरस्टो 103 तर जॅक लीच 4 धावांवर खेळत होते.
शुक्रवारी दिवसातील शेवटच्या सत्राला 4 बाद 135 वरुन पुढे सुरुवात करताना बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक फलंदाजीवर भर देत पाचव्या गडय़ासाठी 128 धावांची भागीदारी साकारली. अखेर नॅथन लियॉनने स्टोक्सला (66) पायचीत करत ही जोडी फोडली. तो बाद झाला, त्यावेळी इंग्लंडची 5 बाद 164 अशी स्थिती होती.
यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर (0) ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर ख्वाजाकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर मार्क वूडने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना काही काळ सैरभैर करुन टाकले. त्याने 41 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 39 धावांचे योगदान दिले. वूड व बेअरस्टो यांनी 7 व्या गडय़ासाठी 72 धावांची भागीदारी साकारली. मात्र, कमिन्सने उसळलेल्या चेंडूवर वूडला बाद करत इंग्लंडची स्थिती 7 बाद 245 अशी केली. बेअरस्टो व लीच यांनी नंतर दिवसाचा खेळ थांबेपर्यंत आणखी पडझड होणार नाही, याची दक्षता घेतली. ऑस्ट्रेलियन संघातर्फे कमिन्स व बोलँड यांनी प्रत्येकी 2 तर स्टार्क, ग्रीन व लियॉन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः 8 बाद 416 (घोषित).
इंग्लंड पहिला डाव ः हसीब हमीद त्रि. गो. स्टार्क 6 (26 चेंडूत 1 चौकार), झॅक क्रॉली त्रि. गो. बोलँड 18 (55 चेंडूत 2 चौकार), डेव्हिड मलान झे. ख्वाजा, गो. ग्रीन 3 (39 चेंडू), जो रुट झे. स्मिथ, गो. बोलँड 0 (7 चेंडू), बेन स्टोक्स पायचीत गो. लियॉन 66 (91 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), जॉनी बेअरस्टो खेळत आहे 103 (140 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार), जोस बटलर झे. ख्वाजा, गो. कमिन्स 0 (8 चेंडू), मार्क वूड झे. लियॉन, गो. कमिन्स 39 (41 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), जॅक लीच खेळत आहे 4 (15 चेंडूत 1 चौकार). अवांतर 19. एकूण 70 षटकात 7 बाद 258.
गडी बाद होण्याचा क्रम
1-22 (हसीब, 9.2), 2-36 (क्रॉली, 16.6), 3-36 (रुट, 20.1), 4-36 (मलान, 21.5), 5-164 (स्टोक्स, 50.6), 6-173 (बटलर, 53.3), 7-245 (वूड, 65.3).
गोलंदाजी
कमिन्स 20-6-68-2, स्टार्क 14-2-49-1, बोलँड 12-6-25-2, कॅमेरुन ग्रीन 9-4-24-1, लियॉन 12-0-71-1, लाबुशाने 3-0-7-0.
चेंडू यष्टीच्या दिशेने, तरीही स्टोक्स पायचीतच्या अपीलमधून का बचावला?
इंग्लंडच्या डावातील 31 व्या षटकात चांगलेच नाटय़ गाजले आणि चेंडू यष्टीला लागला असतानाही बेन स्टोक्सला नाबाद दिले गेले. कॅमेरुन ग्रीनच्या षटकातील पहिला चेंडू सोडून देण्याचा स्टोक्सचा इरादा होता. मात्र, चेंडू पॅडला स्पर्शून मागे गेला असे वाटल्याने पायचीतचे जोरदार अपील झाल्यानंतर मैदानी पंचांनी त्याला बाद दिले. स्टोक्सने यावर डीआरएस घेतला आणि आश्चर्य म्हणजे रिप्लेत चेंडू यष्टीवर लागला असतानाही बेल्स पडले नसल्याचे दिसून आले अन् स्टोक्स आश्चर्यकारकरित्या बचावला. यावेळी 16 धावांवर खेळत असलेल्या स्टोक्सने नंतर 66 धावांपर्यंत मजल मारली.









