प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील चिक्कबस्ती यांच्यावतीने षोडशकारन आणि दशलक्षन अनंतनुपी उद्यापन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अनगोळ येथील आदीनाथ भवन येथे प. पू. 108 आचार्य श्री धर्मसेनमुनी महाराज व प. पू. श्री वृषभ सागरमुनी महाराज यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम होत आहे.
अनगोळ येथील जैन समाजाच्यावतीने हा धार्मिक कार्यक्रम होत असून समाजाच्या उन्नतीसाठी, समाजातील युवकांच्या शिक्षणासाठी आणि समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी, समाज एकसंघ ठेवण्यासाठी तसेच समाजाच्या विविध धार्मिक पूजा, विधी, मंत्रोच्चारपठण, विविध पूजांचे महत्त्व समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धार्मिक शिक्षण आणि धर्माचा उपदेश संपूर्ण समाजाला देणे महत्त्वाचे आहे. विश्वशांतीसाठीदेखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दररोज पहाटे चिक्कबस्ती येथे देवाची विधिवत पूजा, अर्चा करून जलकुंभ पूजा, पंचामृत पूजा केली जाते. त्यानंतर चिक्कबस्ती ते आदीनाथ भवनपर्यंत पालखीतून देवाची तसेच हत्ती, घोडय़ावरून यजमानांची मिरवणूकदेखील काढण्यात येत आहे.
या मिरवणुकीमध्ये महिलादेखील डोकीवर कलश घेऊन सहभागी होत आहेत. दिवसभर आदीनाथभवन येथे विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि देवाचे भजन, आरती म्हटली जाते. सायंकाळी शास्त्र मिरवणूक व आरतीचे आयोजन करण्यात येते. सोमवार दि. 21 रोजी सामूहिक मौंजी बंधन, महाअभिषेक, 1008 कलश पूजेचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. तरी समाजातील सर्व बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
आदीनाथ युवक मंडळ, ब्राह्मी महिला मंडळ तसेच समाजातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच समाजातील अनेकांनी मदतदेखील केली आहे. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.









