वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात ठेवलेल्या सुमारे अडीच लाख रूपये किंमतीच्या प्लास्टीक शीट अज्ञात चोरटय़ाने चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात चोरटय़ांचा शोध घेत आहेत.
राजापूर तालुक्यातील माडबन येथे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जागेत पाणी साठवण तलाव उभारण्याचे काम सुरू होते. मात्र मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे काम थांबवण्यात आले होते. काम थांबल्याने सर्व कामगार आपापल्या गावी निघून गेले होते. मात्र या तलावाच्या कामासाठी आणलेली साधन सामग्री त्याच ठिकाणी ठेवण्यात आली होती.
सद्यस्थितीत लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर पुन्हा या कामाला सुरूवात करण्याच्या दृष्टीने याठिकाणी आलेल्या ठेकदाराला कामाच्या जागी ठेवलेल्या प्लास्टीक शीटपैकी काही शीट गायब असल्याचे निदर्शनास आले. लॉकडाऊनच्या काळात अज्ञातांनी या प्लास्टीक शीटपैकी सुमारे अडीच लाख रूपयांच्या प्लास्टीक शीट चोरून नेल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर राजू गावडे यांनी शनिवारी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. नाटे पोलीसांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा नोंद केला असून चोरटय़ांचा शोध सुरू आहे.









