पावणेपाच वाजता आलेले जेवण दापोलीतील रूग्णांनी नाकारले!
प्रतिनिधी/ दापोली
दुपारी मिळणारे जेवण सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत न मिळाल्याने विलगीकरण कक्षातील रुग्णांनी एकच हंगामा केला. पावणेपाच वाजता आलेले दुपारचे जेवण नाकारले. हा प्रकार शहरातील नवभारत छात्रालयात नव्याने उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात नुकताच घडला.
या विलगीकरण कक्षात 80 ते 90जणांना क्वारन्टाईन करून ठेवण्यात आले आहे. हे सर्वजण मुंबई येथून विविध मार्गांनी दापोली येथे येऊन दाखल झाले आहेत. त्यांना या कक्षात दोन मोठय़ा हॉलमध्ये एकत्र ठेवण्यात आलेले आहे. शुक्रवारी या सर्वांना सकाळचा नाश्ता देण्यात आला. हा नाश्तादेखील अपुरा असल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला. या विलगीकरण कक्षात पाणी पिण्यासाठी केवळ दोन प्लॅस्टीकचे जार उपलब्ध करून देण्यात आले होते. यावरदेखील अनेकांनी संताप व्यक्त केला. विलगीकरण कक्षातील शौचालयाचीदेखील साफसफाई करण्यास कर्मचारी उपलब्ध नव्हते अशी माहिती विलगीकरण कक्षातील रुग्णांनी पत्रकारांना दिली.
शुक्रवारी दुपारी जेवण येथील रुग्णांना देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र ते जेवण येथील रुग्णांना सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत देण्यात आले नव्हते. यानंतर रुग्णांनी ‘तरुण भारत’च्या दापोली कार्यालयात फोनद्वारे ही माहिती कळवली. ‘तरुण भारत’च्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विलगीकरण कक्षात पत्रकार आलेले कळताच प्रशासनाची धावाधाव होऊन अर्ध्या तासात सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली. मात्र विलगीकरण कक्षात अधिकारी जागेवर नसल्याने या अधिकाऱयांवर आधी कारवाई करा, मग आम्ही जेवण स्वीकारू अशी भूमिका विलगीकरण कक्षातील रुग्णांनी घेतली. यामुळे कर्मचाऱयांसमोर मोठा प्रसंग ओढवला. दुपारी काही कर्मचाऱयांनी येऊन कक्षातील काही लहान मुलांना बिस्कीट पुडय़ांचे वाटप केले होते. मात्र हे बिस्कीट पुडे वाटप कक्षातील सर्व लहान मुलांना करण्यात आले नाही असा आरोपदेखील काही महिलांनी यावेळी बोलताना केला.
या विलगीकरण कक्षात तरुण, तरुणी, लहान मुलांपासून अनेक वयोवृद्ध इसमदेखील आहेत. या सर्वांचा तालुका दापोली असल्याने ते विविध मार्गाने दापोलीत येऊन दाखल झाले आहेत. त्यांना सरकारद्वारे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात ठेवल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे होते. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्यांची कोणत्याहीप्रकारची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती, असा आरोपदेखील या कक्षातील अनेकांनी पत्रकारांशी बोलताना केला. जर येथे येऊन उपाशी मरण्यापेक्षा आम्ही आमच्या घरी जाऊन मरू असे म्हणत अनेकांनी बॅगादेखील भरून जाण्याची तयारी केली होती. मात्र त्यांना अधिकाऱयांनी अटकाव केला. यानंतर असा उशीर पुन्हा होणार नाही याची हमी अधिकाऱयांनी घेतल्यावर काहीजणांनी जेवण स्वीकारले. मात्र हे जेवण अनेकांना सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्राप्त झाले.
याबाबत बोलताना दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी वस्तुस्थिती मान्य केली. दापोली काळकाई कोंड येथे एक नवीन कोरोना रुग्ण सापडल्याने तेथून जेवण बनवण्यासाठी येणाया महिला कर्मचारी जेवण बनवायला येत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने अन्य ठिकाणांहून जेवणाची व्यवस्था केली. शिवाय हे जेवण पॅकिंग करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना वेळ गेला. म्हणून जेवण देण्यास उशीर झाला ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली. मात्र यापुढे असा उशीर होणार नाही असे देखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.









