नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शिक्षण मंत्रालयाने देशातील प्रति÷ित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन कुलगुरूपदी प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांतिश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असतील. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. त्या सध्या पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कार्यरत आहेत. यापूर्वी एम. जगदेश कुमार जेएनयूचे कुलगुरू होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी यूजीसीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांच्या माध्यमातून जेएनयूला महिला कुलगुरू मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. जेएनयूमध्ये आतापर्यंत केवळ 12 पुरुष कुलगुरू होते. शांतिश्री यांनी जेएनयूमधूनच तत्वज्ञानात पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी मिळवली आहे. त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून त्यांनी 1986 मध्ये एमफिल आणि 1990 मध्ये पीएचडी मिळवली. यापूर्वी त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातही अध्यापन केले आहे. 1988 मध्ये गोवा विद्यापीठातून त्यांनी आपल्या अध्यापनाची सुरुवात केली. 1993 पासून त्या पुणे विद्यापीठात कार्यरत होत्या.
59 वषीय शांतिश्री यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. तेव्हा त्यांची आई तेथील लेनिनग्राड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तामिळ आणि तेलुगू विषयांच्या प्राध्यापक होत्या. जेएनयूच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत शांतिश्रींसोबत अविनाश कुमार पांडे यांचे नावही चर्चेत होते. आता शांतिश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या 13 व्या कुलगुरू ठरल्या आहेत.









