नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी अलिकडेच जाहीर जेईई ऍडव्हान्स परीक्षेच्या निकालात पहिल्या 3 जणांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे. शिक्षणमंत्र्यांनी देशात पहिल्या आलेला चिराग फलोर, दुसरा आलेला भुवन आणि तिसऱया क्रमांकावरील वैभवला त्यांच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशात उपलब्ध सर्व संशोधन योजनांची आठवण त्यांनी या विद्यार्थ्यांना करून दिली आहे.
शिक्षणमंत्र्यांनी सर्वप्रथम देशात पहिले स्थान मिळविलेल्या चिराग फलोरशी संवाद साधला आहे. जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पहिला आल्यावरही चिराग कुठल्याही आयआयटीत प्रवेश घेऊ इच्छित नाही. तो एमआयटीत प्रवेश घेणार आहे. खगोलशास्त्रात स्वतःची कारकीर्द घडवू इच्छित असल्याचे चिरागने केंद्रीय मंत्र्यांशी बोलताना म्हटले आहे.
यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी भुवन आणि वैभवशी संवाद साधला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र अभ्यासक्रमात सामील होणार असल्याचे सांगितले आहे. दोनवेळा स्थगित झाल्यावरही 27 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या जेईई ऍडव्हान्सचा निकाल 5 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदा 43 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांसाठी आता आयआयटी आणि एनआयटी समुपदेशनाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.









