हस्तिनापुरातील कौरवांच्या सभागृहातून बलराम व श्रीकृष्ण निघाले. त्यानंतर, ज्यांची मने निष्कपट होती अशा कुणाकुणाला ते भेटले ते ऐका.
पाण्डवांचिया दु:खेंकरून। भीष्में वर्जिलें सभास्थान । कृपाचार्यही आत्मभुवन । न ये टाकून बाहीर । गान्धारीप्रति जाऊनि विदुर । करवी दु:खाचा परिहार । सांत्वनोक्ति बोले सार । अन्य व्यवहार विसर्जिला । पाण्डवांचे ऐश्वर्य गुण । शौर्य प्रताप विद्याभ्यसन । स्मरोनि विलाप करी द्रोण । न संडी सदन अतुदु:खें। रामकृष्ण हें जाणोनि चित्तीं । स्वयें जावोनि भीष्माप्रति । तुल्यदु:खें विलाप करिती । गुण आठविती पार्थांचे । भीष्म म्हणे भो जगदीशा। पाण्डवांऐसियां प्रतापी पुरुषां । दैवें वोपिली कोण दशा । जेंवि पाडसा दावाग्नि । कुंतीसारिखी साध्वी रत्न । धर्माऐसा सत्यप्रतिज्ञ । हनुमत्प्रतिमा भीमसेन। महाबलवान ओजस्वी । धनुर्विद्येचा अवतार । अपर भार्गव कीं रामचंद्र । अर्जुनाऐसा धनुर्धर । लाक्षागारिं जळाला । अनंग किंवा राकारंग । तैसे माद्रीतनय दोघ। सौदर्यमन्दाकिनीचे वोघ । पावले भंग अंगारें। त्रैलोक्मयमण्डित भरिते कीर्ति । समरिं अमरां लाविते ख्याति । स्वचातुर्यें बृहस्पति। युक्तिप्रयुक्ति डोलविते। समरिं पुरली नाहीं हांव । भोगिलें नाहीं नृपगौरव । कैसें विचित्र अघटित दैव । पडिले वाडवअवदानीं। यशोलक्ष्मीचे कीर्तिध्वज । कीं वीरश्रियेचे उद्दाम भुज । कीं ब्रह्माण्डधारक जे दिग्गज। ते हे आत्मज पाण्डूचे । समरिं कृतान्त खिळिती बाणीं । ते जळाले लाक्षासदनीं । कुरुवंशाची रेखा उणी । जाली धरणी निर्दैव । ऐसे विलाप बहुतां परी । पाण्डव दु:खें गाङ्गेय करी । त्यातें कवळूनि राममुरारी । विलपती आणि सान्तविती । कुरुवरवृद्धा महाराजा । म्हणती सावध गंगात्मजा ।
कृतकर्माच्या फळभोगबीजा । अंकुर येती यथाकाळें । जो जो जैसें कर्म करी । तो तो तैसा फळभोग वरी । ईश्वरसत्तेची हे थोरी । चराचरिं नियामक । भूत भावी या संकेतें । भीष्मा बुझाविलें परमार्थें । यामाजि गान्धार स्वकर्मातें । भोगिती ऐसें सूचविलें ।
पांडवांचे कुंतीसह लाक्षागृहात जळून निधन झाले ही वार्ता ऐकल्यापासून पितामह भीष्मानी सभागृहात जाणे टाळले होते. कृपाचार्यही आपल्या सदनातून बाहेर पडत नव्हते. गांधारीकडे जाऊन विदुर सांत्वनाचे चार शब्द तिच्याशी बोलला. पण त्यानेही इतर सर्व व्यवहार थांबवले होते. पांडवांचे ऐश्वर्य, गुण, शौर्य, प्रताप, विद्याभ्यास यांची आठवण काढून गुरु द्रोणाचार्य विलाप करत घरातच बसून होते. हे सर्व जाणून बलराम व कृष्ण पहिल्यांदा वृद्ध पितामह भीष्मांकडे त्यांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. त्यांना पाहून भीष्म म्हणाले-हे जगदीशा! पांडवांसारख्या प्रतापी वीरांना काय ही गती प्राप्त झाली! ज्याप्रमाणे एखादे हरिणाचे पाडस वणव्यात सापडून होरपळून जीवाला मुकावे, तसे हे झाले. कुंतीसारखे साध्वी रत्न, धर्मासारखा सत्यप्रतिज्ञ, जणू दुसरा हनुमान असा बलवान भीमसेन, धनुर्विद्येचा अवतार, दुसरा भार्गव किंवा रामचंद्र असा अर्जून, मदनासारखे सुंदर नकुल व सहदेव हे सारे आगीत जळून भस्म झाले.
Ad. देवदत्त परुळेकर








