अध्याय चौदावा
भगवंत अनन्य भक्तांबद्दल उद्धवाशी बोलत आहेत. ते म्हणाले, माझे भक्त ज्या कुणाला पाहतील त्याच्यात त्यांना मीच दिसत असतो. समोर दिसलेल्या व्यक्तीत माझे दर्शन झाले की, माझ्या भक्ताचे भान हरपते आणि समोरच्या व्यक्तीवर तो अनन्य प्रीती करु लागतो. अशा प्रकारे समोर मीच आहे या भावनेने त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे माझी भक्ती करणेच होय. जे सर्वांच्यावर मीच समजून प्रेम करतात त्यांना महंत म्हणतात. प्रत्येकावर प्रेम करणाऱया माझ्या भक्ताच्या ठिकाणी असणारे कामादिक सर्व विकारदोष मावळून जातात. कामाची निवृत्ती झाली असता सहजच निर्विषयस्थिती प्राप्त होते आणि चित्तात केवळ माझे चिंतन चालू राहते. अशावेळी माझ्या सुखाचा सुखलाभ होतो. हे सुख अमर्याद असतं. वेदांनासुद्धा या सुखाचा अंत लागत नाही. वेद झाले तरी ते केवळ शब्दच आणि माझे प्रेम, भक्ती ह्या गोष्टी तर भावनेवर आधारित आहेत आणि भावना ही प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट असते. त्यामुळे माझ्या सुखाची कल्पना करताना वेदांनी हात टेकले तर त्यात नवल ते काय ? आत्मसुखामुळे चित्तवृत्ती जेथल्या तेथे विरून जाते. चित्तवृत्ती म्हणजे स्वभाव होय पण आपल्या स्वभावाचाच विसर पडल्याने रागलोभादी सगळय़ांचाच विसर पडतो. परिणामी सर्व अवयव केवळ आनंदमय होतात. आणखी काय सांगू ? मोक्षसुखाच्या ठिकाणीसुद्धा या सुखाची गोडी नाही. हरिभक्त हे केवढे धन्य आहेत पहा ! अशा सुखाकरिता साधक लोक जीव प्राण तोडून यातायात करीत असतात. त्यासाठी ते काय काय करत असतात हे पाहिलं तर मन चकित होतं. आत्मसुखाच्या प्राप्तीकरिता, लोक तपादि साधने करून शरीर झिजवितात. विषयांचे नियमन करतात. कोणी योगयाग करीत बसतात, कोणी शास्त्राभ्यास करतात, कोणी सर्वस्वाचा त्याग करतात, कोणी घर व बायको यांचाच संग सोडून देतात. कोणी फलाहारावर राहतात, कोणी निराहारच राहतात, कोणी ब्रह्मचर्यव्रत पाळतात, कोणी दऱयाखोऱयांत राहतात, कोणी पर्वताच्या माथ्यावर जाऊन बसतात, कोणी पर्वतांच्या गुहेत शिरतात ! कोणी लांब जटा सोडतात, तर कोणी जटांना भरपूर गांठीच मारून त्यांचे झुंबड करून ठेवतात. कोणी कोणी आपली नखेच मोठी वाढवून ठेवतात, कोणी हठयोग साधन करतात, कोणी उन्मत्त पिशाचवत् स्वैर वर्तन करीत असतात. कोणी तांबडी वस्त्रे धारण करून बोडकेच वावरतात. कोणी चिंध्याच अंगावर घालतात. कोणी तीर्थयात्रा करुन शरीर कृश करतात. कोणी मौन धरून मुकेच बसतात. कोणी आंगाला राख फासतात, कोणी शंखच फुंकीत राहतात. कोणी सारखी बडबडच करीत असतात. कोणाला पाण्याचेच वेड असते. कोणी दर्भात आणि मृत्तीकेतच गळून गेलेले असतात. अशा अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. त्याने साधक किती जर्जर होतात त्यांची गणतीच नाही ! पण हे सर्व ते स्वतःच्या कल्पना लढवून करत असल्याने त्यात मी कर्ता हा भाव असल्याने निरपेक्षतेनं माझे भजन घडत नाही त्यामुळे माझ्या भजनातून येणारे पावित्र्य त्यापैकी कोणालाच येत नाही आणि पावित्र्यामुळे माझ्या भक्तांना मिळणारे आत्मसुख, यापैकी कोणालाच प्राप्त होत नाही. त्या सुखाचे तोंड त्यांना स्वप्नात सुद्धा दिसत नाही, इतके त्या सुखाला ते पारखे झालेले असते. चंद्राच्या किरणापासून निघणारे अमृत ज्याप्रमाणे कावळय़ांना दुर्लभ असते, त्याप्रमाणे माझे आत्मसुख अभक्तांना खरोखर प्राप्त होत नाही. गायीच्या आचळाला चिकटलेल्या मूर्ख गोचडीला रक्तच आवडते. बिचारे दुर्दैवी गोचीड जवळच असलेल्या दुधाचे सेवन करू शकत नाही. त्याप्रमाणे माझी भक्ती सोडून नानाप्रकारच्या इतर साधनांनी जे व्यर्थ कष्ट करतात, त्यांना खरोखरच, उद्धवा ! माझ्या आत्मसुखाची प्राप्ती होत नाही. ज्यांनी माझ्या भजनाच्या आवडीने भक्तीची लागवड केली, त्यांनाच खरोखर माझ्या आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली.
क्रमशः







