खोल्यांची दुर्दशा, संबंधितांचे दुर्लक्ष, सुविधा पुरविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्मयाचे मुख्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱया तहसीलदार कार्यालयात अनेक समस्या निर्माण झाल्याने शासकीय कागदपत्रांसाठी जाणाऱया नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचेरी गल्लीतील जुन्या तहसीलदार कार्यालयात अनेक शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्यामुळे दररोज नागरिकांची वर्दळ असते. मात्र याठिकाणी सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. परिणामी नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
जुन्या तहसीलदार कार्यालयातील काही विभाग जुन्या मनपा इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील काही विभाग रिकामी पडले आहेत तर काही खोल्याही रिकामी पडून आहेत. या रिकामी खोल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे.
कार्यालयात वापरात नसलेल्या खोल्यांमध्ये भंगाराचे साहित्य टाकण्यात आले आहे. शिवाय कचरा, प्लास्टिक टाकण्यात आल्याने अस्वच्छता पसरली आहे. सध्या कार्यालयात चार विभाग सुरू आहेत.
याठिकाणी सात-बारा, जात-उत्पन्न दाखला व इतर कागदपत्रे पुरविली जातात. त्यामुळे नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र परिसरात अस्वच्छता पसरल्याने नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आवारात बसण्यासाठी आसनव्यवस्था नसल्याने वयोवृद्धांना ताटकळत थांबावे लागते. सतत गजबजणाऱया या कार्यालयात शौचालयाअभावी सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. तसेच पाऊस झाल्यास सगळीकडे अस्वच्छता पसरते. त्यामुळे संबंधितांनी कार्यालयात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.









