किचनला घराचा आत्मा असं संबोधलं जातं. हे किचन सर्वार्थाने परिपूर्ण असावं याकडे सर्वांचा कटाक्ष असतो. किचनचे महत्त्व आजही सर्व खोल्यांच्या तुलनेत वरचढ ठरते आहे. हे किचन आजच्या काळाला अनुसरून आधुनिकतेचा परिस्पर्श घेणारे ठरते आहे. रचनेत सोपे आणि आधुनिक साधनसामग्रीसह किचन आपला दिमाख दाखवते आहे.
र्वीच्या किचनच्या
तुलनेत आज तिचे रूपडेच पूर्णतः बदलून गेल्याचे पाहायला
मिळते आहे. कल्पकतेची
झलक किचनच्या रचनेपासून मांडणीतून दिसते. नव्या तंत्रज्ञानाची
कास धरून हे किचन अधिक आधुनिक होते आहे. आज हे किचन बंदीस्तपणाच्या
संकल्पनेला मागे झुगारत आहे. ओपन किचनची संकल्पना आता रूळू लागली
आहे. लिव्हिंगरूमशी दोस्ती करणारी ओपन किचन्स बहुतेक मोठय़ा अपार्टमेंटमध्ये
दिसू लागली आहेत. भारतीयांनीही या संकल्पनेचं स्वागत केलं.
थोडीशी खुल्या स्वरूपाची ही किचन हवेशीरही असते. मोकळेपणाला यातून वावही मिळतो. जागेच्या टंचाईची बंधनेही
या किचनने मागे टाकली. ठराविक साच्यातील किचनची रचना पाहण्याचा
काळ मागे पडला. नव्याची नवलाईप्रमाणे किचन आधुनिकतेने सुसज्ज
होऊ लागलं. ओपन किचनच्या संकल्पनेत सहजपणे वावरता येते व जागाही
कामासाठी पुरेशी असते.
हे किचन जागेच्याबाबतीत अडथळा आणणारं ठरू नये, हा मुख्य हेतू किचन रचनेत दिसतो. किचन ओटा सरळ रेषेतला व पुरेशी जागा असलेला असणे हेही पाहिले जाते. कुटुंबिय सदस्य एकत्र राहून काम करू शकतील एवढी ऐसपैस जागा किचनमध्ये असण्याला प्राधान्य दिलं जातंय. त्यांच्यासाठी मग बैठकीची व्यवस्थाही किचनमध्ये केली जाते आहे. सुटसुटीत रचना करतानाच पर्यावरण मैत्रीयुक्त साहित्याचा वापर किचनमध्ये होत आहे. जागतिक स्तरावरच्या ट्रेंडस्ची जाण ठेवत स्थानिक उपलब्ध साधनांचा वापर किचनकरीता करणे जास्त सोयीचे असते. अंतर्गत सजावटकारही किचन रचनेत हीच कास धरत आहेत. किचनचं सौंदर्य वाढलं पाहिजे या मताशी साऱयांचेच एकमत आहे. पण पर्यावरणाला अनुकूल मैत्रीयुक्त साहित्य वापरलं जाईल ही काळजीही दुसरीकडे बाळगली जात आहे. दिर्घकाळ वापरता येणारं, प्रदूषण न करणारं असं साहित्य वापरलं जातंय. हायटेक किचन अप्लायन्सेसना आज मागणी होताना दिसते. याने गृहिणीच्या स्वयंपाकाचे कामही हलके होत आहे. मायक्रोव्हेव, ब्लेंडर आणि ज्युसर ही साधने तर आता अनेकांच्या घरचीच झाली आहेत. नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी ही साधने गृहिणीला उत्तम साथ देत आहेत.
स्वयंपाकाची पद्धत जरी जुनीच असली तरी आता आधुनिक साधने याकरीता वापरली जात आहेत. तेव्हा आताच्या घडीला महिलांचा वेळ वाचवणारी अनेक साधने किचनमध्ये प्रवेश करू लागली आहेत. एअर फ्रायर, कॉफी मशिन्स, सूप मेकर आणि स्टीमर्स अशी साधनेही आता किचनमध्ये कायमस्वरूपी सदस्य होत आहेत. हा बदलही आजच्या किचनमध्ये अनुभवायला मिळतो आहे. आजच्या जीवनशैलीला अनुसरून आजचे किचन तांत्रिकदृष्टय़ा समृद्ध होते आहे. सर्व कुटुंबाला त्यातील साधने वापरता यावीत हा उद्देशही बाळगला जातोय. निमुळत्या आकाराची उत्पादने खूपच जागा वाचवणारी आहेत तर किचनच्या मूळ रचनेला सहाय्य करण्याचे काम साधनांनी केले आहे. बिल्ट-इन-ओव्हन्स, मायक्रोव्हेव, ड्रॉव्हर्स, स्मार्ट रेफ्रिजरेटर्स व डिशवॉशर्स यांचा वापर किचनमध्ये सर्रास होतो आहे. याने आपलं जगणंही मॉडर्न करून ठेवलेलं आहे.