मनीषा सुभेदार / बेळगाव
कोरोनावरील उपचार करण्यासाठी पूरक ठरणाऱया कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला अद्याप प्रारंभ झालेला नाही. ही चाचणी करण्यापूर्वी अनेक प्रक्रिया हॉस्पिटल्सना पूर्ण कराव्या लागणार आहेत. बेळगावमध्ये डॉ. आंबेडकर रोडवरील जीवनरेखा हॉस्पिटलला कोव्हॅक्सिन लसीची चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमित भाते यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी केली जाईल. लवकरच प्रत्यक्ष मानवी चाचणीला प्रारंभ होण्याची शक्मयता डॉ. अमित भाते यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
कोणत्याही साथीच्या रोगावर किंवा अन्य आजारावर एखादी लस तयार करण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन असते. त्यासाठी अनेक टप्प्यांवर शासकीय आणि वैद्यकीय क्षेत्रांना परवानगी आणि मान्यता मिळणे आवश्यक असते. हैद्राबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून कोव्हॅक्सिन स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचीनुसार या लसीची मानवी चाचणी घेणे आवश्यक आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच सदर लस बाजारपेठेत औषधाच्या स्वरुपात येवू शकते. मात्र त्यासाठी सर्व वैद्यकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते.
तिसऱया टप्प्यातील चाचणी जीवनरेखामध्ये होणार
कोणतीही लस बाजारात येण्यासाठी सहा टप्पे पूर्ण करणे आवश्यक असते. पहिला टप्पा हा लसीवर संशोधन करण्याचा आहे. दुसऱया टप्प्यात प्रायोगिक चाचणी होते. तिसऱया टप्प्यात मानवावर चाचणी केली जाते जी बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये केली जाणार आहे. या टप्प्यांतर्गतच 100 पेक्षा कमी जणांवर प्रयोग केला जातो. त्यानंतर शेकडो जणांवर व त्यानंतर हजारो जणांवर लसीचा वापर केला जातो. चौथ्या टप्प्यात आवश्यक असणाऱया मंजुरीची प्रक्रिया पार पाडली जाते. पाचव्या टप्प्यात लसीचे उत्पादन होवून सहाव्या टप्प्यात लसीच्या गुणवत्तेवर काम केले जाते.
मानवी चाचणीसाठी स्वयंस्फूर्तीने लोकांनी पुढे येणे आवश्यक आहे. यासाठी 18 ते 55 ही पात्रता असून इच्छुक व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब किंवा कोणत्याही स्वरुपाचा आजार नसावा, थोडक्मयात ती धडधाकट व सुदृढ असली पाहिजे. अशा व्यक्तींसाठी हॉस्पिटलने आवाहन केले आहे. असे स्वसंसेवक पुढे आल्यानंतर त्यांची प्रथम शारीरिक चाचणी केली जाईल. त्यानंतर त्यांची कोविड तपासणीही होईल. त्यांचा स्वॅब चाचणीसाठी पाठविला जाईल, हा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना लस टोचली जाईल. काही दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा दुसरी लस टोचली जाईल. सहा महिन्यांनी त्यांची पुन्हा सर्व तऱहेची तपासणी केली जाईल.
या सर्व टप्प्यावरील प्रक्रिया पार पाडल्या जात असताना आयसीएमआरला हॉस्पिटलतर्फे आवश्यक ती माहिती पुरविली जाईल. त्यामुळे हॉस्पिटलने ठरविले आणि चाचणी झाली इतक्मया सहज पद्धतीने कोणतीच चाचणी होत नसते. जीवनरेखा हॉस्पिटल व आयसीएमआर यांच्यामध्ये यापूर्वीसुद्धा अशा चाचण्यांबाबत देवाण-घेवाण झालेली आहे. म्हणून आयसीएमआरने जीवनरेखा हॉस्पिटलची निवड केली आहे.
चाचणीसाठी स्वसंसेवकांनी पुढे यावेः डॉ. अमित भाते
राज्यातच फक्त बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलला कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी करण्यास मान्यता मिळालेली आहे. बेळगावकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे का? हे तपासले जाईल. ही चाचणी जर यशस्वी झाली तर कोरोना विरुद्धच्या लढाईत ते एक फार मोठे पाऊल असेल. त्यामुळेच या चाचणीसाठी स्वसंसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन डॉक्टर अमित भाते यांनी केले आहे.