विविध उद्योग, व्यवसायांची प्रगतीकडे वाटचाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड19 च्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची घडी विस्कटल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु अनलॉकच्या प्रक्रियेनंतर अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात जीएसटी संकलन आणि वीज विक्रीतील सादर करण्यात आलेले आकडे हे देशातील अर्थव्यवस्था सावरत असल्याचे दर्शवत असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांनी म्हटले आहे.
सदर्न इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीकडून आयोजित करण्यात आलेल्या सिक्की 306 या कार्यक्रमात बोलताना, विविध उद्योग, व्यवसाय सध्या प्रगतीकडे वाटचाल करत असल्याने हा बदल दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये मागील महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे आणि त्यासोबत उद्योगधंदे सुरु झाल्याने वीज मागणीत झालेली मोठी वाढ यांचाही लाभ अर्थव्यवस्था सावरण्यास झाल्याचे रंगराजन यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी काळात सरकारच्या नियमावलीत शिथिलता मिळत गेल्यास त्याचाही फायदा वाहन, बँकिंग, धातू, असंघटीत क्षेत्रासह अन्य विभागास चालना मिळून वर्ष 2021 ते 22 या कालावधीमधील आर्थिक वर्षात मोठी झेप अर्थव्यवस्था घेणार असल्याचे संकेतही अनेक तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.









