सरकारचे उत्पन्न घटले – जून महिन्यात 92,849 कोटी रुपयांचा कर जमा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात जीएसटी संकलनाचा आकडा 9 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (वस्तू आणि सेवा कर) संकलन जून महिन्यात 92,849 कोटी रुपये राहिले आहे. मे महिन्यात हा आकडा 1.02 लाख कोटी रुपये राहिला होता. अर्थमंत्रालयाने यासंबंधीची माहिती मंगळवारी दिली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन 95,480 कोटी रुपये राहिले होते.
जूनमधील जीएसटी महसूल पाहिल्यास यात केंद्र सरकारचा हिस्सा म्हणजेच सीजीएसटी 16,424 कोटी रुपये, राज्यांचा हिस्सा म्हणजेच एसजीएसटी 20,397 कोटी रुपये आणि आयजीसीटीच्या 49,079 कोटी रुपयांसमवेत अधिभाराचे 6,949 कोटी रुपये देखील सामील आहेत. जून महिन्यात जीएसटी उत्पन्न मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
करदात्यांना दिलासा
जीएसटी संकलनाचा हा आकडा 5 जून ते 5 जुलैदरम्यानचा आहे. यादरम्यान कराशी संबंधित अनेक सवलती देण्यात आल्या आहेत, यात आयटीआर फायलिंगची मुदत 15 दिवसांपर्यंत वाढविणे देखील सामील आहे. याचबरोबर व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय देखील आहे. सरकारने नियमाकीय तडजोडीच्या स्वरुपात जूनमध्ये आयजीएसटीमधून 19,286 कोटी रुपयांचा सीजीएसटी आणि 16,939 कोटी रुपयांचा एसजीएसटी सेटल केला आहे.
जूनसाठी जीएसटी संकलन मेदरम्यान करण्यात आलेल्या व्यापारी देवाणीघेवाणीशी संबंधित आहे. या कालावधीत बहुतांश राज्ये अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण किंवा आंशिक लॉकडाऊन लागू होते. याचमुळे मे महिन्यातील ई-वे बिल जनरेशनचा आकडा 30 टक्क्यांनी कमी झाला आहे. मे महिन्यात 3.99 कोटी ई-वे बिल जनरेट झाले, तर एप्रिल महिन्यात हा आकडा 5.88 कोटी इतका राहिला होता.
व्यापारात वाढ होण्याची शक्यता
निर्बंध शिथिल करण्यात आल्याने व्यावसायिक घडामोडींना चालना मिळाली आहे. याचमुळे जून महिन्यात 5.5 कोटी ई-वे बिल जनरेट झाले आहेत. व्यापार आणि व्यवसाय रुळावर येत असल्याचे यातून दिसून येते. दरदिनी सरासरी बिल जनरेशनचा डाटा पाहिल्यास 20 जूनपासून आतापर्यंत ई-वे बिलचा आकडा 20 लाखांच्या पातळीवर पोहोचल्याचे आढळून येते. तर 9 ते 22 मे या कालावधीत प्रतिदिन सरासरी 22 लाख ई-वे बिल जनरेट झाले होते.









