ऑनलाईन टीम / टोकियो :
‘जी-7′ संघटनेत दक्षिण कोरियाला सहभागी करण्यास जपानने विरोध दर्शविला आहे. या संघटनेची व्याप्ती वाढवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाच्या परिषदेत दक्षिण कोरियासह काही देशांना सहभागी करून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जी-7 या संघटनेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका आहेत. जगातील सात विकसित देशांचा हा एक अभिजात वर्ग आहे. ही संघटना जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवते. मात्र, ही संघटना आता कालबाह्य होत चालली आहे. जगातील घडामोडी समजाव्यात यासाठी ट्रम्प यांनी 30 मे रोजी ‘जी-7′ संघटनेमध्ये रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारताला सहभागी करून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मात्र, दक्षिण कोरियाला ‘जी-7′ संघटनेमध्ये सहभागी करून घेण्याच्या ट्रम्प यांच्या संभाव्य हालचालींना जपानने विरोध केला आहे. दक्षिण कोरियाला ‘जी-7’मध्ये सहभागी करून घेणे म्हणजे जपानचा आशियातील एकमेव सदस्याचा दर्जा गमावणासारखे आहे, असे जपानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.









