15 जूनपर्यंत जिल्हय़ात पावसाचा ‘यलो अलर्ट’
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात मागील 2 दिवसांपासून पडणाऱया पावसाने रविवारी चांगलीच विश्रांती घेतल़ी खरिपाच्या पेरणीचे काम हाती घेण्यात आले असताना अचानक पावसाने घेतलेल्या उसंतीमुळे बळीराजा चिंतातूर झाला आह़े पेरलेले बियाणे पक्षी टिपण्याचा धोका निर्माण झाला आह़े तर कडकडीत उन्हामुळे शेती मशागतीच्या कामालाही उशीर होण्याची शक्यता आह़े दरम्यान 15 जूनपर्यंत हवामान खात्याने रत्नागिरी जिल्हय़ात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारा बळीराजा कोकणात दाखल झालेल्या पावसाने सुखावला होत़ा जिह्याच्या सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होत़ी यामुळे पेरणीच्या कामाला सुरूवात झाली होत़ी कोकणात प्रामुख्याने भातशेती घेतली जाते. त्यासाठी शेतकऱयाने कंबर कसली होत़ी मात्र रविवार पावसाच्या दडीमुळे चिंतेत भर पडली आह़े
मागील 2 दिवसांच्या पावसाने रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील प्रथम संतोष पिलणकर यांच्या घरावर झाड पडल्याची घटना घडल़ी या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले तर घराचे सुमारे 5 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले तर अन्य तालुक्यात पावसाने नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.
रविवारी पाऊस गायब
मौजे दापोलीः दापोली तालुक्यामध्ये शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी मात्र विश्रांती घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. पावसाचे आगमन झाल्याने व आता पाऊस पडेल, या अंदाजाने शेतकऱयांनी पेंडीग ठेवलेली पेरणी करण्यास सुरूवात केली. मात्र रविवारी पाऊस गायब झाल्याने व उन्हे पडण्यास सुरूवात झाल्यामुळे पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दोन दिवस पडलेल्या पावसात कोणत्याही आपत्तीची नोंद नसल्याचे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.









