प्रतिनिधी/ सातारा
काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी कारवायांनी जनतेला त्रस्त करणाऱ्या 51 जणांना तडीपार करुन पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी गुन्हेगारी विश्वाला मोठा तडाखा दिला होता. त्यावेळीच आणखीन मोठ्या कारवाईचे संकेत त्यांनी दिले होते. शुक्रवारी जिल्हय़ातील चार टोळय़ांना दणका देत तब्बल 18 गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केल्याने गुन्हेगारांचा धाबे दणाणले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील दोन, वाईतील एक व कराड मलकापुरातील टोळ्यावर ही कारवाई करत संघटीत गुन्हेगारी प्रवत्तींना मोठा दणका एसपी बंसल यांनी दिला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, गर्दी, मारामारी, दरोडा, दुखापत अशा गुन्हय़ात सहभागी असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर इम्तीयाज मुजावर (वय 22, रा. पिरवाडी, सातारा) व त्याच्या टोळीत साथीदार आमीर सलीम शेख (वय 19, रा. वनवासवाडी, कृष्णानगर, सातारा), अभिजीत/आबु राजू भिसे, (वय 18, रा. आदर्शनगरी शेजारी सैदापूर, ता. सातारा), सोरभ/गोटय़ा संजय जाधव (वय 20 वर्षे, रा. सैदापूर, ता. सातारा) जगदीश रामेश्वर मते, (वय 20, रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा), आकाश हणमंत पवार, (वय 20 वर्ष, रा. सैदापूर, ता. सातारा) अशा सहा जणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सातारा शहर पोलीस ठाण्याकडून सादर करण्यात आला होता. सातारा शहर पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव मंजूर करत या टोळीला पोलीस अधिक्षक तथा अजयकुमार बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.
सैदापुरातील गुन्हेगारी तडाखा
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारच्या गुन्हय़ात सहभागी असलेल्या टोळीचा प्रमुख सागर नागराज गोसावी (वय 23), टोळीतील साथीदार विपुल तानाजी नलवडे (वय 20), अर्जुन नागराज गोसावी (वय 35), रवि निलकंठ घाडगे (वय 25, सर्व रा. सैदापूर, ता. सातारा) व अक्षय रंगनाथ लोखंडे (वय 20 रा. गडकरआळी, सातारा) या पाचजणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव मंजूर करुन त्यांनाही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
वाईच्या लाखानगरमधील दहशत मोडीत
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हय़ातील टोळीचा प्रमुख रॉकी निवास घाडगे (वय 29), टोळीतील साथीदार कृष्णा निवास घाडगे (वय 23) सनी निवास घाडगे (वय 30, वर्षे सर्व. रा. लाखानगर, सोनगिरवाडी ता. वाई) या तीन सराईत गुन्हेगांराना तडीपार करण्याचा प्रस्ताव मंजूर करत त्यांना एक वर्षांसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले आहे.
मलकापुरातील टोळीला दणका
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे करणाऱया टोळीचा प्रमुख आशिष अशोक पाडळकर (वय 32) व टोळीतील साथीदार इंद्रजित हणमंत पवार (वय 24), अनिकेत रमेश शेलार (वय 21, सर्व रा. मलकापूर, कराड) व सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20 रा. कोयना वसाहत कराड) या कुख्यात चार गुन्हेगारांच्या तडीपारीच्या प्रस्तावाला मंजुरी देत एसपी बंसल यांनी त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करत मलकापुरातील गुन्हेगारी विश्वाला तडाखा दिला आहे. त्यांना पुर्ण सातारा जिल्हा व लगतच्या सांगली जिल्हयातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुका हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
अनेकवेळा संधी देवून सुधारणा नाही
या चारही टोळीतील 18 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे गुन्हे करण्याची वृत्ती थांबत नव्हती. त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व शारीरिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांच्या उपद्रवांमुळे त्यांच्यावर कडक कारवाई अशी मागणी होत होती. अनेकवेळा संधी देवून न सुधारल्याने त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला गेला. तो हद्दपार प्राधिकरणापुढे गेल्यानंतर धडक कारवाई करत एसपी बंसल यांनी तडीपारीचा आदेश दिला आहे. आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासाचे आत त्यांना हद्दपार क्षेत्राबाहेर गेले पाहिजे असाही आदेश एसपी बंसल यांनी बजावला आहे.
पोलीस दलाचे जनतेतून अभिनंदन
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षातर्फे अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व डी.बी.स्टाफ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य पुरावा सादर केला. या सर्वांचे जनतेतून अभिनंदन होत आहे.








