पुन्हा काळजी घेण्याची गरज : चार जणांनी केली कोरोनावर मात
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाची धास्ती कमी होत असतानाच विदेशामध्ये पुन्हा नव्या व्हेरिएंटच्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी जिल्हय़ामध्ये पाच रुग्ण आढळले आहेत तर चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. या आढळलेल्या दोन रुग्णांमध्ये दोन वैद्यकीय विद्यालयाच्या विद्यार्थिनींना लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी एका खासगी दंत महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थिनींना कोरोना झाल्याचे उघडकीस आले. या दोन्ही विद्यार्थिनी परप्रांतीय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात इतर ठिकाणी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आता प्रत्येकाने पुन्हा काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून मास्क व इतर कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 79,984 रुग्ण आढळले असून यापैकी 78 हजार 976 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारीही चार जण बरे झाले. सध्या जिल्हय़ात 65 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. मृतांचा सरकारी आकडा 943 वर पोहोचला आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे
धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. याचबरोबर चामराजनगर मेडिकल कॉलेजमध्येही काही विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता बेळगावमधील एका खासगी दंत महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱया परप्रांतीय दोन विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.









