दोघांचा मृत्यू, 137 जण झाले बरे
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ामध्ये मंगळवारी कोरोनाचे 114 नवे रुग्ण आढळून आले. तर दोघांचा मृत्यू झाला असून 137 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तरी देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रभाव जिल्हय़ामध्ये कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या 1642 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या अनलॉक आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. अजूनही बरेच जण विनामास्क फिरताना दिसत आहे. मात्र अशा प्रकारामुळेच रुग्णसंख्या वाढत असून स्वतःच प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 75 हजार 706 रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 73 हजार 287 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 777 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. दररोज 1600 ते 1800 रुग्ण सापडत होते. मात्र आता हा आकडा 100 च्या आसपासच आहे. असे असले तरी अजूनही धोका असल्याने प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
मंगळवारी बेळगाव तालुक्मयामध्ये एकूण 43 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील 33 जणांचा तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे. टी. व्ही. सेंटर, हिंडलगा जेल, कलमेश्वरनगर, अनगोळ, सदाशिवनगर, गांधीनगर, शहापूर, मारुती गल्ली-बेळगाव, कंग्राळी के. एच., कंग्राळी बी. के., नावगे, हिरेबागेवाडी, होनगा, भाग्यनगर, खासबाग, काळी आमराई, रामतीर्थनगर, शिवबसवनगर, आनंदनगर-वडगाव, ताशिलदार गल्ली परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.









