कोरोनाचा फटका : रोजगारासाठी प्रयत्न होणे गरजेचे : नोकरी, व्यवसाय ठप्प
अजय गडेकर / आडेली:
कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. तसेच मुंबई, गोवा, पुणेसारख्या शहरात कोरोनाचा विळखा वाढल्यामुळे उद्योगधंदे बंद आहेत. यामुळे जिल्हय़ातील तरुण-तरुणींनी रोजगार गमावला आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून हे चिंताजनक आहे. बेरोजगारांचा त्वरित सर्व्हे करून त्यांना नोकऱया रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यासाठी याकडे शासनाने विशेषतः लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वच लोकप्रतिनिधींच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा विकसित होत आहे. परंतु गेल्या चार महिन्यांपासून उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती व त्यामुळे बहुसंख्य युवक-युवती तसेच अन्य सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण भागातील मजुरदार वर्ग यांचा रोजगार बुडाला आहे. यासह सर्वच घटक नोकरी, व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक विवंनचनेत आहेत.
कोकणातील बहुसंख्य नागरिक मुंबई, गोवा, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरसारख्या ठिकाणी नोकरी करीत होता. परंतु या सर्वच ठिकाणी कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बहुसंख्य नागरिकांनी गाव गाठले आहे. जिल्हय़ातील मोठय़ा प्रमाणावर तरुणवर्ग हा गोव्यात नोकरीस होता. परंतु मुंबई शहर, गोवा राज्यातही कोरोनाच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तरुणवर्ग रोजगाराच्या शोधात आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता तरुणवर्ग मूळगावीच स्थिरावला आहे.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणे आवश्यक!
शासनाने कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेस जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तसेच विविध राजकीय पक्षांनीही परराज्यातील तसेच गरजू घटकांना मुबलक प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. परंतु आजची कोरोनाची परिस्थिती पाहता तरुण वर्ग रोजगार नसल्याने वैफल्यग्रस्त होत आहे. तसेच बहुसंख्य गावात तरुणवर्ग बेरोजगार आहेत. याबाबत ग्रामीण भागात सर्व्हे होणे आवश्यक आहे. आज आयटीआय, पदवीधर, डीएड, बीएडधारक, कृषी पदवीप्राप्त तसेच विविध शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीच्या प्रतीक्षेत दिवस काढत आहेत. शिक्षण, आरोग्य, विद्युत तसेच अन्य विभागात भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.
शासकीय योजनांतून उन्नती साधावी!
शासकीय नोकरीच्या वाटा बिकट झाल्याने शिक्षित विद्यार्थ्यांनी शासनाच्या महामंडळच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याद्वारे रोजगार उपलब्ध कसा होईल, यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विभागाशी संलग्नित योजना, फळबाग लागवड आदींची माहिती घेऊन त्याद्वारेही आर्थिक उन्नती होऊ शकते. आंबा, काजू, बांबू लागवड व अन्य लागवडीसाठी शासनाकडून अनुदान मिळते. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदी व्यवसाय ग्रामीण भागात आर्थिक चलन मिळवून देतात. यासाठी शासनाने प्रोत्साहनपर जादा अनुदान दिल्यास व शेवटच्या घटकापर्यंत माहिती, प्रसार केल्यास तरुणवर्ग त्यातही आपले भवितव्य घडवू शकतो.









