तीन दिवसांपासून सायंकाळच्या सत्रात पाऊस : सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ल्यात मुसळधार
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ाच्या अनेक भागात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. गेले तीन दिवस सायंकाळच्या सत्रात होणाऱया या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सावंतवाडी शहरात तर तासभर पाऊस कोसळत होता. तर बऱयाच भागात पावसाचा शिडकावा झाला.
जिल्हय़ाच्या काही भागात वादळी वाऱयासह पाऊस झाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांनाही याचा फटका बसला आहे. जिल्हय़ाची राजधानी असलेल्या सिंधुदुर्ग नगरीतही गुरुवारी पाऊस कोसळला. कार्यालयीन कामकाज आटोपून घरी फिरण्याच्या तयारीत असतानाच पाऊस झाल्याने कर्मचाऱयांचीही काहीकाळ तारांबळ उडाली. मंगळवारी मुख्यालय परिसरातील एका रस्त्यावर झाड पडल्याने काही काळासाठी वाहतूक ही ठप्प झाली होती. दरम्यान, या वादळी वाऱयांसह पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या नुकसानीची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली नसल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडीत पुन्हा एकदा हजेरी
सावंतवाडी : मंगळवारी वादळी वाऱयासह झालेल्या पावसाने साऱयांची झोप उडविली होती. गुरुवारी पुन्हा एकदा पावसाने सावंतवाडीत जोरदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला. अवकाळी पावसामुळे तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. गावागावात अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. दूरध्वनी यंत्रणाही कोलमडली आहे. असे असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गायब आहे. त्यामुळे शाळांमधून क्वारंटाईन झालेल्यांचे हाल होत आहेत.
दोडामार्गला वादळासह हजेरी
दोडामार्ग : गुरुवारी सायंकाळी दोडामार्गात गडगडाट व लखलखाटासह जोरदार पाऊस बरसला. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला. शिवाय कोरडय़ा पडलेल्या विहिरींना पाणी आल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. सुरुवातीला चक्रीवादळ झाले. त्यानंतर पावसास सुरुवात झाली. दोडामार्ग शहरासह तालुक्यातील विविध भागात हा पाऊस बरसला.
वेंगुर्ल्यातही मुसळधार
वेंगुर्ले तालुक्मयातही सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने मुसळधार स्वरुपात हजेरी लावून अनेकांना सुखद धक्का दिला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.









