मृतांमध्ये कुडचीचा (ता. रायबाग) वृद्ध, बेळगावातील वीरभद्रनगर येथील व्यक्तीचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. शनिवारी एकाच दिवशी बेळगाव जिल्हय़ात दोघा जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती बिम्स प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे.
प्रकृती खालावल्याने कुडची (ता. रायबाग) येथील 70 वषीय वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती बिम्सच्या सूत्रांनी दिली आहे. याबरोबरच शुक्रवारी उपचारासाठी दाखल झालेल्या वीरभद्रनगर-बेळगाव येथील 48 वर्षीय इसमाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे. त्यामुळे शनिवारी दोघांचा कोरोनाने बळी गेला आहे. वीरभद्रनगर-बेळगाव येथील इसमाला शुक्रवारी रात्री 11 वाजता प्रकृती अस्वस्थामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅबही जमविण्यात आले होते. शनिवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र शनिवारी रात्री 7.30 वाजता त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्हय़ातील आणखी 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राखीव दलाच्या तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर कोरोना बळींची संख्याही वाढत चालली असून एकूण बाधितांची संख्या 377 वर पोहोचली आहे.
राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिन माहितीनुसार शनिवारी अथणी तालुक्मयातील 12, बेळगाव तालुक्मयातील 11, खानापूर तालुक्मयातील 1 व सौंदत्ती तालुक्मयातील 3 अशी एकूण 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार घेणारे आणखी दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 377 वर पोहोचली असून यापैकी 316 जण बरे झाले आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत विलगीकरण कक्षात 65 जण सक्रिय रुग्ण होते. बाधितांची संख्या वाढत चालली असून त्यामुळे जिल्हय़ातील 10 हजार 63 जणांना 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची स्वॅब तपासणीही करण्यात येणार आहे.
राज्य राखीव दलाच्या तीन पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह
कोगनोळी तपास नाक्मयावर सेवा बजावलेल्या राज्य राखीव दलाच्या तीन पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलीस मुख्यालया शेजारी असलेले वसतीगृह सीलडाऊन करण्यात आले आहे. शुक्रवारी या परिसरात सॅनिटायझेशनही करण्यात आले. या पोलिसांच्या थेट संपर्कातील काही जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कासार महिलेला कोरोनाची बाधा
तर माळी गल्ली येथील 58 वषीय एका कासार महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. जोशीमळा येथील 52 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी सीलडाऊन केले आहे. नेहरुनगर येथील 31 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. करविनकोप्प (ता. खानापूर) येथील 30 वषीय लष्करी जवानाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. करिकट्टी (ता. सौंदत्ती) येथील तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शनिवारी अथणी तालुक्मयातील गुंडेवाडी, अनंतपूर, झुंजरवाड, चिकट्टी, संकोनट्टी येथे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर शेडबाळ येथे मुंबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धामणे, कंग्राळी बुद्रुक येथेही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
3 हजार जणांचे स्वॅब पाठविले
बेळगाव शहर व जिल्हय़ातील 2 हजार 971 जणांचे स्वॅब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल यायचा आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 27 हजार 434 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 23 हजार 527 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 377 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आरोग्य विभागाने सरसकट स्वॅब तपासणी वाढविली आहे. बेळगाव शहरातील पोलीस हेडक्वॉर्टर्स, नेहरुनगर, माळी गल्ली, सुभाषनगर, जोशी मळा व तालुक्मयातील कंग्राळी बी.के., धामणे-येळ्ळूर परिसरात आरोग्य विभागाने खबरदारी वाढविली आहे.
कासार महिलेला कोरोना
माळी गल्ली येथील व्यवसायाने कासर असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून त्या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सरसकट स्वॅब तपासणी मोहिमेत माळी गल्ली येथील 58 वषीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. शनिवारी तिचा अहवाल पॉझिटिक्ह आल्याने खळबळ माजली आहे. तिच्या थेट संपर्कातील कुटुंबीयांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या महिलेकडे येवून बांगडय़ा भरुन घेतलेल्या महिलांनाही धास्ती वाटू लागली आहे.
पोलीस दलात खबरदारी
दोन दिवसांपूर्वी मच्छे येथील राज्य राखीव दलाच्या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी जिल्हा सशस्त्र दलातील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलात खबरदारी घेण्यात आली आहे. यासंबंधी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता त्या तीन पोलिसांच्या संपर्कातील नागरिक व कुटुंबीयांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तपास नाक्मयावर एकत्रीतपणे सेवा बजावलेल्या एका पोलीसाच्या घशात खवखवणे सुरू झाले. त्यामुळे संशयाने त्याची स्वॅब तपासणी करण्यात आली. तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना थोपविण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.
दहा जण कोरोनामुक्त
कोरोनामुक्त झालेल्या दहा जणांना शनिवारी घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांनी दिली. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या 27 जणांपैकी केरळ, महाराष्ट्रातून आलेल्यांचा समावेश आहे. यापैकी पाचहून अधिक जणांना कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली, याचा उलगडा झाला नाही. यासंबंधी माहिती मिळविण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.









