आतापर्यंत 116 जणांना लागण तर 13 जण सारीने दगावले
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनाच्या गंभीरतेने व्यापक स्वरूप धारण केले आहे. त्यात आता कोरोनासोबत ’सारी’ तापाचा प्रसार होऊ लागल्याने त्याचा धसका नागरिकांनी घेतला आहे. सारी तापाचे रुग्ण आठवडय़ात दुप्पटीपेक्षा अधिक वाढले आहेत. आतापर्यंत 116 जणांना ’सारी’ या रोगाची लागण झाली आहे तर आतापर्यंत या रोगाने 13 बळी घेतल्याने कोरोनापाठोपाठ सारीवर मात करण्याचे मोठे आव्हान आहे.
कोरोना सारखाच ‘सारी हा देखील समूहरोगाचा एक भाग आहे. त्यात अनेक आजारांचा समावेश आहे. कोरोना विषाणू व सारीचा थेट कोणताही संबंध नाही. तरीही कोरोना हा सारीपैकी एक असल्याचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचाराला आलेल्यांपैकी 13 जणांचा आतापर्यंत सारी तापाने मृत्यू झाला आहे. कोरोनापाठोपाठ सारी रोग झपाटय़ाने पसरू लागल्याने नागरिकांत धास्ती पसरत आहे.
जिल्हा रूग्णालयाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविलेल्या अहवालात सारी तापाने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात सारी तापाचे 116 रुग्ण सापडले आहेत. सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन फुफ्फुसातील दाब वाढतो. फुफ्फुसाला सुज येते. न्युमोनिया होऊन रक्तात ऑक्सीजन शिल्लक रहात नसल्याने मेंदू, हृदय, किडनी निकामी होतात. शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे निदान वेळेवर होत नाही. तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही. विषाणू अतिशय सुक्ष्म असल्याने तपासणीत दिसत नाही. माणसाचे हृदय काम करीत नसल्याने फुफ्फुसे बंद पडून हृदय, किडनीवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.









