एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 636 वर : कणकवलीत सर्वाधिक 25 रुग्ण : सक्रिय रुग्ण 208, आणखी 17 जणांना डिस्चार्ज, 416 ‘कोरोना’मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात ‘कोरोना’चे रुग्ण आता झपाटय़ाने वाढू लागले असून शनिवारी 30 तर रविवारी 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दोन दिवसात तब्ब्ल 68 रुग्ण आढळल्याने ‘कोरोना’बाधित रुग्णांचा एकूण आकडा 636 वर पोहोचला आहे. 68 रुग्णांमध्ये सर्वाधिक कणकवली तालुक्यात 25 जण असून त्यात कुडाळ 15, सावंतवाडी 9, मालवण 7, वैभववाडी 6, देवगड 5, वेंगुर्ल्यातील एकाचा समावेश आहे. तर गोवा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे
जिल्हय़ात मार्चअखेर ‘कोरोना’चा शिरकाव झाल्यापासून जून अखेरपर्यंत कोरोना नियंत्रणात होता. मात्र, जुलै महिना सुरू झाल्यावर रुग्णसंख्येत वाढ होत गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून चाकरमान्यांचा ओघ वाढल्यानंतर ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता तर झपाटय़ाने रुग्ण वाढत असून दोन दिवसात 68 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ‘कोरोना’बाधित एकूण रुग्णांची संख्या 636 झाली आहे. त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 417 रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत 208 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन ‘वॉर्ड’मध्ये उपचार सुरू आहेत.
दोन दिवसात 68 रुग्ण, कणकवलीत सर्वाधिक 25
जिल्हय़ात शनिवारी 30 तर रविवारी 38 असे 68 पॉझिटिव्ह रुग्ण दोन दिवसात आढळले. यामध्ये कणकवली तालुक्यात सर्वाधिक 25 रुग्ण आहेत. कणकवलीतील 25 रुग्ण हे कणकवली पटकीदेवी, तळेरे, सांगवे, कासार्डे प्रत्येकी एक, कणकवली, कलमठ, फोंडाघाट प्रत्येकी दोन, खारेपाटण तीन आणि वारगाव मध्ये 12 रुग्ण सापडले. कुडाळ तालुक्यात 14 रुग्ण आढळले असून कुडाळ 6, सांगिर्डेवाडी, पिंगुळी प्रत्येकी दोन, तेंडोली, पणदूर, ओरोस, अणाव प्रत्येकी एक रुग्ण तसेच पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमधील लॅबच्या तपासणीत एक रुग्ण आढळला आहे. मात्र, त्याचे गाव समजलेले नाही.
सावंतवाडी तालुक्यात नऊ रुग्ण आढळले असून त्यात सावंतवाडी 5, सोनुर्ली दोन, माडखोल व माठेवाडा प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. मालवण तालुक्यात सात रुग्ण आढळले असून त्यात तळगाव दोन, वायरी, मालवण, आंगणेवाडी, देऊळवाडा आणि गवंडीवाडा प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यात सहा रुग्ण आढळले. ते सर्व शहरातीलच आहेत. देवगड तालुक्यात 5 रुग्ण आढळले. त्यामध्ये देवगडमधील दोन, नाडण, शिरगाव आणि मिठबाव प्रत्येकी एक आणि वेंगुर्ले तालुक्यात शिरोडय़ातील एकाचा समावेश आहे.
1 एकूण अहवाल 9,587
2 पॉझिटिव्ह आलेले अहवाल 636
3 निगेटिव्ह आलेले अहवाल 8,715
4 प्रतिक्षेतील अहवाल 260
5 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 208
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 12 (एक गोवा येथील)
7 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 416
विलगीकरण व जिल्हय़ात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 विलगीकरणातील एकूण व्यक्ती 24,004
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 4,062
10 सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 65









