कुंभाडमधील महिलेचा कामथे रूग्णालयात मृत्यू
प्रतिनिधी/ खेड, रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील कामथे रूग्णालयात उपचार घेणाऱया खेड तालुक्यातील कुंभाड येथील वृद्धेचा मृत्यूपश्चात अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 30 वर पोहोचली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 12 नवे रूग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील खासगी रूग्णालयतील कर्मचाऱयाचा समावेश आहे.
संबधीत 70 वर्षीय महिलेचा 08 जुलै रोजी मृत्यू झाला होता. तिचे स्वॅब तपासणी अहवाल शुक्रवारी पॉझीटीव्ह आला आहे. तिच्यावर चिपळूण येथील रामतिर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या महिलेच्या मृत्यूने जिल्हय़ाच्या कोरोना बळींची संख्या 30 तर तालुक्यातील बळींची संख्या तीन झाली आहे. यापूर्वी अलसुरे व शिवतर येथील तरूणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.
शुक्रवार सायंकाळपासून आलेल्या अहवालांमध्ये 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 851 झाली आहे. यामध्ये रत्नागिरीतील तीन, कामथेमध्ये 6, कळंबणी 2 तर गुहागरमधील एकाचा समावेश आहे.
शनिवारी 15 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 561 झाली आहे. शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये घरडामधून तीन, कामथे 1 व रत्नागिरी 12 जणांचा समावेश आहे. एकूण 287 जण उपचाराखाली असून त्यातील 9 जण होम आयसोलेशनमध्ये तर 4 जण जिल्हय़ाबाहेर उपचार घेत आहेत.
278 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 11 हजार 942 नमुने तपासण्यात आले असून त्यातील 851 अहवाल पॉजिटीव्ह तर 10 हजार 778 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 278 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
खेडमध्ये दोन नवे रूग्ण
शुक्रवारी रात्री प्राप्त अहवालानुसार खेड तालुक्यात आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही रूग्ण घरडा वसाहतीतील आहेत. त्यामुळे घरडा कंपनीशी संबंधित रूग्णांची संख्या 46 झाली आहे. घरडा वसाहतीतील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने भीतीचे वातावरण असून प्रशासनाची चिंताही वाढत आहे.
चिपळुणात आणखी 6 पॉझीटीव्ह
चिपळूण : शुक्रवारी रात्री चिपळूण शहर, खेर्डी, गोवळकोट येथे कोरोनाचे सहा रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या 163 वर पोहचली आहे. आतापर्यंत 81जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
शहरातील गोवळकोट रोड येथे 34 रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता गोवळकोट गावातच रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. बाधित रूग्णाला काही दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे उपचार करणाऱया दोन डॉक्टरांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
शहरातील मुरादपूर व मार्कंडीत प्रत्येकी 1 रूग्ण आढळला असून ते आधीच्या रूग्णांच्या संपर्कात होते. खेर्डी मोहल्ल्यातही दोन रूग्ण आढळले आहेत. कामथे रूग्णालयात मृत्यू झालेल्या खेड तालुक्यातील कुंभाड येथील महिला मोरवणे येथील मुलीकडे गेली होती. त्यामुळे संपर्कातील व्यक्तीची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.









