कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून कोरोनाची लागण वाढत चालली आहे. रविवारी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगाव जिल्हय़ातील आणखी चौघा जणांचा कोरोना रुग्णांत समावेश झालेला असून कुडची (ता. रायबाग) व हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) हे कोरोनाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे.
रविवारी सकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये राज्यातील एकूण 11 जणांमध्ये हिरेबागेवाडी येथील एक 38 वषीय युवक, कुडची (ता. रायबाग) येथील 19 वषीय तरुण, 55 वषीय इसम व 25 वषीय तरुण या चौघा जणांचा समावेश होता. सायंकाळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये रविवारी एका दिवसात 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे उघडकीस आले.
केस क्रमांक 128 (हिरेबागेवाडी येथील तरुण) याच्या संपर्कातून त्याच गावातील 38 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून कुडची येथील 41 वषीय महिलेच्या (केस क्र. 150) संपर्कातून उर्वरित तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. या सर्व चौघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर
बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या रविवारी 14 वर पोहोचली असून या सर्व 14 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याचे बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. संपर्कातून संसर्गाला सुरुवात झाली असून हा धोका वाढण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
कुडचीतील ‘त्या’ महिलेमुळे
कुटुंबातील आणखी तिघांना लागण
कुडची येथील तीन महिलांसह चौघा जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 5 एप्रिल रोजी आरोग्य विभागाने यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. केस क्रमांक 50 मधील 41 वषीय महिला 13 ते 18 मार्च 2020 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या तबलिगी जमातच्या धर्मसभेत भाग घेऊन 20 मार्च रोजी ती आपल्या गावी परतली होती. तिला कोरोनाची लागण झाली असून तिच्या संपर्कातून तिच्या कुटुंबातील आणखी तिघा जणांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
हिरेबागेवाडीतील ‘त्या’ तरुणाच्या
संपर्कातून मित्रालाही लागण
हिरेबागेवाडी येथील 28 वषीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे 3 एप्रिल रोजी स्पष्ट झाले होते. याच दिवशी कॅम्प येथील एक तरुण व बेळगुंदी येथील एका वृद्धाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. केस क्रमांक 128 चा हा तरुणही 13 ते 18 मार्च 2020 पर्यंत झालेल्या नवी दिल्ली येथील मरकजमधून धर्मसभेत भाग घेऊन तो आपल्या गावी परतला होता. त्याच्या संपर्कातून त्याची आई, वडील व भावालाही कोरोनाची लागण झाली होती. आता त्याच्या 38 वषीय मित्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कडेकोट सीलडाऊन
कुडचीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने खबरदारी घेताना सीलडाऊन कडक केले आहे. रस्त्यांवर फिरणाऱयांवर काठीचा प्रसाद देण्यात येत आहे. याबरोबरच शहरातील मेडिकल, दवाखाने, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र, पेट्रोलपंपही बंद करण्यात आले आहेत. येथील मुख्य मार्गावर सन्नाटा पसरला आहे.
जिल्हा-तालुका प्रशासनाची तारांबळ
कुडची येथील आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट होताच जिल्हा आणि तालुका पातळीवरील अधिकाऱयांची एकच तारांबळ उडाली आहे. यापूर्वी चार रुग्ण आढळल्याने कुडचीत तहसीलदार, अथणीचे डीएसपी, तालुका वैद्याधिकारी, कुडचीचे वैद्याधिकारी, नगर परिषद कर्मचारी, स्थानिक पोलीस कर्मचारी हे तळ ठोकून आहेत. पुन्हा तिघांना लागण झाल्याने सर्व अधिकाऱयांची तारांबळ उडाली आहे.
वाहनांची तपासणी
दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटल आवारात निर्जंतुकीकरण चेंबर उभारण्यात आले आहेत. बुडाच्या पुढाकारातून विलगीकरण कक्षाबाहेर निर्जंतुकीकरण चेंबर बसविण्यात आले असून या कक्षात जाणाऱया प्रत्येकावर औषधांची फवारणी होते. शनिवारी सायंकाळपासून हे चेंबर कार्यरत झाले आहे. विलगीकरण कक्षात एकूण 14 जणांवर उपचार सुरू असल्यामुळे पोलिसांनी या परिसरातील लॉकडाऊन अधिक कडक केले असून या मार्गावरून येणारी जाणारी वाहने अडवून तपासणी करण्यात येत होती.
प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त
संशयितांवर व कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱया परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांसमोर थुंकण्याचा प्रकार लक्षात घेऊन संशयितांना शहरातील वेगवेगळय़ा लॉजमध्ये हलविण्यात आले असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत आहेत. सिव्हिलमधून पलायन करण्याचे प्रकारही वाढल्यामुळे प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
224 जणांचा अहवाल निगेव्हिट
जिल्हा सर्वेक्षण विभागाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जिल्हय़ातील 1636 जणांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत 335 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यापैकी 224 जणांचे अहवाल निगेव्हिट तर 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला आणखी 77 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील 640 जणांनी चौदा दिवसांची तर 709 जणांनी 28 दिवसांचा क्वारंटाईन अवधी पूर्ण केला असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे.
वैद्यकीय कर्मचाऱयांचीही स्वॅब तपासणी
कोरोनाग्रस्त व संशयितांवर उपचार करणाऱया वैद्यकीय कर्मचारी व तपासणीसाठी स्वॅबचे नमुने घेणाऱया वैद्यकीय कर्मचाऱयांच्याही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 3 ते 12 एप्रिल या काळात एकूण 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱयांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येत आहे
50 हून अधिक क्वारंटाईन वेगवेगळय़ा खोलीत
गेल्या आठवडय़ात कोरोनाबाधित असलेल्या चौघांच्या कुटुंबीयांसह संपर्कात आलेल्या 50 जणांना खबरदारी म्हणून येथील सरकारी वसतिगृहाच्या इमारतीत दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना वेगवेगळय़ा खोल्यांमध्ये ठेवण्यात आले नव्हते. एका खोलीमध्ये चौघांना ठेवण्यात आले होते. मात्र आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याने सदर 50 हून अधिक क्वारंटाईनना वेगवेगळय़ा खोलीत ठेवण्यात आल्याचे समजते
घरोघरी भेट देऊन थर्मल स्कॅनिंग
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने सतर्कता बाळगत बेळगाव येथून वैद्यकीय पथक कुडचीत दाखल झाले आहे. सदर पथकाकडून घरोघरी जात प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. याबरोबरच प्रत्येकाची माहिती घेण्याचे कामही या पथकाकडून सुरू आहे. यातून होणारा संसर्ग टाळण्यास मदत होणार असल्याने प्रत्येकाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
बुलेटिनमध्ये तफावत?
रविवारी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये रायबाग येथील 3 तर हिरेबागेवाडी येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा उल्लेख आहे. मात्र, स्थानिक माहितीनुसार कुडची दोघेजण व हिरेबागेवाडी येथील दोघाजणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी खात्री करून घेण्यासाठी जिल्हा सर्वेक्षण विभागाचे डॉ. बाळकृष्ण तुक्कार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच कुडची येथे रविवारी आणखी तिघे रुग्ण आढळल्याची चर्चा बुलेटिननंतर सर्वत्र सुरू होती. दरम्यान याबाबत चिकोडीच्या प्रातांधिकारी रविंद्र करलिंगन्नावर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्टीकरण देताना कुडचीत आणखी दोनच रुग्ण आढळल्याचे सांगितले.









