कॅम्प, कुडची येथील प्रत्येकी चौघा जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. पूर्णपणे बरे झालेल्या आणखी 11 जणांना सोमवारी घरी पाठविण्यात आले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 26 वर पोहोचली आहे. सोमवारी बेळगाव येथील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आली नाही. कोरोनाच्या चिंतेत असलेल्या बेळगावकरांसाठी ही खूषखबर ठरली आहे.
कॅम्प व कुडची येथील प्रत्येकी चौघे जण, संकेश्वर, येळ्ळूर व हिरेबागेवाडी येथील प्रत्येकी 1 असे एकूण अकरा जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये येळ्ळूर येथील महिलेचा समावेश आहे. टाळय़ा वाजवून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी सोमवारी दुपारी त्यांना निरोप दिला.
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी ही माहिती दिली आहे. कॅम्प परिसरातील रुग्ण क्रमांक 355, 356, 358, 359, कुडची येथील 296, 297, 299 आणि 301, संकेश्वर येथील 293, येळ्ळूर येथील 295 व हिरेबागेवाडी येथील 193 क्रमांकाचे रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हय़ातील 73 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 26 पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. उर्वरित बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, सोमवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका दावणगेरे येथील 22 जणांचा समावेश आहे. या अहवालात बेळगावातील एकाही संशयिताचा समावेश नाही. त्यामुळे रविवारी व सोमवारी दोन्ही दिवशी बेळगावला बऱयापैकी दिलासा मिळाला आहे.
35 अहवाल निगेटिव्ह
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेळगावातून स्वॅब तपासणीला पाठविण्यात आलेले 35 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्हय़ातील 6 हजार 882 जणांच्या आरोग्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे तर 4 हजार 161 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. यावरून क्वारंटाईनची संख्या वाढत चालली आहे.
बॉक्स
915 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हय़ातील 5 हजार 580 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले आहेत. आतापर्यंत 4 हजार 556 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 73 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 26 जण कोरोनामुक्त झाले असून 46 जणांवर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला आणखी 915 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे.









