चार वर्षांत 37 कोटी 98 लाखांचे अनुदान : 48 कातकरी बांधवांना हक्काची घरे
प्रतिनिधी / ओरोस:
शासनाच्या बेघरांसाठीच्या विविध घरकुल योजनांतर्गत जिल्हय़ात मागील चार वर्षांत तब्बल 3165 लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून नवीन घरांचा लाभ देण्यात आला. आहे. शौचालयासह 269 चौरस फूट घरासाठी प्रत्येकी 1 लाख 20 हजारप्रमाणे 37 कोटी 98 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये 48 आदिवासी जमातीच्या घरांचाही समावेश असून मुणगे येथे 17 कुटुंबांसाठीची वसाहत निर्माण करण्यात आली आहे. शिवाय मोंड गावातही 17 घरकुलांची नवीन वसाहत अस्तित्वात येत आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार बेघर व कच्चे घर अशी नोंद झालेल्या कुटुंबांना घरासाठी शासन अनुदान लाभ देण्यासाठीची मान्यता देणारी ब यादी केंद्र शासनाने जारी केली आहे. यामध्ये जिल्हय़ातील 6191 घरकुलांचा समावेश आहे. दरम्यान दरवर्षी किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, याचे उद्दिष्ट शासनाकडून ठरवून दिले जाते. प्रधानमंत्री आवास या योजनेंतर्गत अनुसुचित जाती, जमाती अल्पसंख्याक व इतर प्रवर्गातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. सन 2016-17 पासून आतापर्यंत 2710 घरकुल बांधणीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजुरी दिली आहे. यापैकी 1818 घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित प्रगतीत आहेत. आणखी 4373 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
आदिवासी योजनेंतर्गत 48 घरकुले
याशिवाय रमाई योजनेंतर्गत अनुसुचित जाती, शबरी अंतर्गत अनुसुचित जमाती आणि आदिवासी कातकरी आदिम जमाती आवास योजनेंतर्गतही जिल्हय़ातील आदिवासी अशा अनेक लाभार्थ्यांना घरकुलं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सन 2016-17 ते आतापर्यंत रमाई अंतर्गत 1284, शबरी अंतर्गत 15 तर आदिवासी योजनेंतर्गत 48 घरकुले देण्यात आली आहेत.
दरम्यान आदिवासी योजनेचा लाभ देताना जमीन उपलब्धतेचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र वेगवेगळय़ा ठिकाणी राहणाऱया या जमातीच्या लोकांना एकत्र करून मुणगे येथे 17 कुटुंबियांची वसाहत निर्माण करण्यात आली. जमीन नसलेल्यांना अर्धा गुंठा जमीन खरेदीसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये अनुदान योजनेतून जमीन उपलब्ध करून देत ही वसाहत तयार करण्यात आली आहे. तसेच मोंड येथेही 17 कुटुंबियांसाठीची वसाहत तयार करण्यात येत आहे. शिवाय दाभोळे येथे दोन घरे, कुणकेश्वर येथे तीन घरे, शिरगाव येथे चार घरे, वळिवंडे येथे पाच घरे अशा प्रकारे लाभ देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री रमाई
वर्ष मंजूर । पूर्ण मंजूर । पूर्ण
2016-17 1166 । 1111 325 । 318
2017-18 441 । 418 650 । 603
20118-19 218 । 198 500 । 363
2019-20 855 । 121 300 । –
एकूण 2710 । 1818 1775 । 1284
अनेक लाभार्थी प्रतीक्षा यादीवर
दरम्यान प्रत्येक लाभार्थ्याला केवळ एकाच योजनेतून लाभ घेता येतो. त्यामुळे मागील चार वर्षांत विविध योजनांतर्गत आतापर्यंत 3165 लाभार्थ्यांची घरकुल समस्या मिटली असली, तरी अद्याप अनेक लाभार्थी प्रतीक्षा यादीवर लटकले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई विचारात घेता 1 लाख 20 हजाराचे अनुदान यापुढे अपुरे ठरणार आहे. तसेच 30 डिसेंबरनंतर ‘प्रधानमंत्री’साठीचे अनुदान अप्राप्त आहे. तर रमाई अंतर्गत अनुदान नसल्याने 63 लाभार्थ्यांना यावर्षीचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शासनाने हे अनुदान लवकर द्यावे तसेच पुढील यादी लवकरात लवकर मंजूर करावी, अशी मागणी संबंधित लाभार्थ्यांकडून होत आहे.









