आतापर्यंत एकालाही कोरोनाची लागण नाही ; जिल्हाधिकारी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यामध्ये स्वयं जमावबंदी लागू करण्यात आली तरी अनेक ठिकाणी पाच पेक्षा अधिक जण थांबत आहेत, फिरतही आहेत. त्यामुळे आता 144 कलम लागू करण्यात आला असून यापुढे जर पाचपेक्षा अधिक जण फिरत किंवा एकत्र थांबले असती तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिला आहे.
संशयित कोरोनाग्रस्त पाच रुग्णांचे रक्त बेंगळूर व इतर ठिकाणी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्यामधील दोघांचा अहवाल आला असून त्या दोघांनाही विषाणुची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बैलहोंगल परिसरात रविवारी कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. मात्र त्या सर्व खोट्या असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विदेशातून आलेल्या 229 जणांची तपासणी करण्यात आली आहे. ते सर्व जण सुरक्षित आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा झाली नाहि, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेंगळूर आणि शिमोगा येथे लॅब असून त्या ठिकाणी संशयित रुग्णांचे रक्त पाठविण्यात येत आहे. सोमवारी आणखी एका संशयिताचे रक्त पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवालाही लवकरच मिळेल. सध्या तरी बेळगाव जिल्ह्यामध्ये कोणताही रुग्ण आढळला नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
केवळ गरजू साहित्यांचे दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. इतर दुकाने पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. प्रत्येकाने स्वतःच आपली जबाबदारी घेणे गरजेचे आहे. भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात आली आहेत. इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्हा आरोग्य विभागातर्फे सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे काम नाहि. मात्र प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. काही जणांची खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. ते सर्व जण निरोगी आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेच कारण नाही.
पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनीही यापुढे 144 कलम लागू असून पाचपेक्षा अधिक जण एका ठिकाणी थांबवू नये. थांबल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.