प्रतिनिधी / सातारा :
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2021-22 मध्ये 15 व्या वित्त आयोगातून शहरी व निमशहरी भागासाठी वाढत्या शहरी लोकसंखेचा विचार करता केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या नियोजनातुन सातारा जिल्हयात 31 नवीन नागरी आरोग्य केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. या नागरी आरोग्य केंद्रांमार्फत जिल्हयातील शहरी भागामध्ये नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वीत होणार आहेत. शहरी भागाच्या लोकसंख्या वाढीनुसार जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये लोकसंख्येनुसार ही नागरी आरोग्य केंद्र स्थापन होणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
सातारा तालुक्यात शाहुनगर, लक्ष्मीटेकडी, प्रतापसिंहनगर, शाहुपुरी, तामजाईनगर, पिरवाडी व शेंद्रे अशा 7 ठिकाणी, जावली तालुक्यात गांधीनगर, महाबळेश्वर कोलेआळी व सिध्दार्थनगर, वाई तालुक्यात सोनगिरवाडी व सिध्दनाथवाडी, खंडाळा तालुक्यात बेघरवस्ती खंडाळा व दिवारनगर लोणंद, फलटण तालुक्यात मलटण व लक्ष्मीनगर, माण तालुक्यात एकतानगर दहिवडी, उदयमनगर व शिक्षक कॉलनी म्हसवड, खटाव तालुक्यात आदीनाथनगर, कोरेगांव तालुक्यात लक्ष्मीनगर कोरेगोव, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व साठेनगर रहिमतपूर, कराड तालुक्यात शुक्रवारपेठ – 2, सैदापूर, संभाजी मार्केट, वाखनरोड कराड, लक्ष्मीनगर व आगाशिवनगर मलकापूर, पाटण तालुक्यात इंदिरानगर कातकरी वस्ती येथे होणार आहेत.
नागरी आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकिय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, स्टफ नर्स व शिपाई या पदांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्रांची इमारत 1500 ते 2500 चौरस फुट, औषधे व साहित्य हे देखील शासनामार्फत पुरविण्यात येणार आहे. शहरी व निमशहरी नागरी आरोग्य केंद्रांमुळे या भागातील लोकांना आरोग्य सुविधा सोईचे होणार आहे. या केंद्रामुळे केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आरोग्य सुविधा लोकांपर्यत पोहचण्यास निश्चित मदत होणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या कस्तुरबा, गोडोली, कराड व फलटण येथील नागरी आरोग्य केंद्र यांना पॉली क्लिनिक करण्यात आले आहे. या पॉली क्लिनिकमध्ये आरोग्य विषयक अधुनिक उपचार उपलबध होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.









