पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय : 23 मार्च ते 4 मेपर्यंत सीआरपीसी कलम 144
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱया पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी डॉ. के. त्यागराजन यांनी सोमवारी सायंकाळी हा आदेश जारी केला आहे.
मंगळवार दि. 23 मार्चपासून 4 मेपर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयापासून 100 मीटर अंतरापर्यंत जमावबंदी असणार आहे. या बरोबरच वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली आहे.
नियमांचे पालन आवश्यक
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱयांचे कार्यालय असते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते या कार्यालयात येतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एका उमेदवारासोबत केवळ दोघा जणांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशाची मुभा आहे. कोरोना थोपविण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पाचहून अधिक जणांनी गटाने थांबू नये. मिरवणूक-सभा घेऊ नयेत, लाठय़ा-काठय़ा, भाले, तलवार, गदा, बंदूक, चाकू आदी शस्त्रs घेऊन या परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बरोबरच फटाके, स्फोटके व दगडही या परिसरात आणता येणार नाहीत. जमावबंदीच्या काळात प्रतिकृती दहन करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
आदेशांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
कोणतेही विजयोत्सव, सार्वजनिक मिरवणूक, सार्वजनिक किंवा राजकीय सभा घेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात प्रक्षोभक गाणी वाजविणे, चित्रे किंवा प्रतिकृतींचे प्रदर्शन करणे किंवा नैतिकतेचा भंग होईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला असून अंत्यसंस्कार, लग्न, धार्मिक मिरवणुकांना हा आदेश लागू राहणार नाही.