प्रतिनिधी /सातारा :
जिल्हा रुग्णालयातील नवीन पोलीस ठाण्याचे घोंगडे अद्याप भिजतच पडले आहे. पोलीस ठाण्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला रुग्णालयाच्या प्रशासनाने कोलदांडा घातला आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरोना योद्धा म्हणून पोलिसांचे आणखी किती बळी हवे आहेत ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयात पोलीस ठाण्याच्या जवळचा वार्ड कोरोनाबाधित व्यक्तींसाठी आरक्षित करण्यात आला. मुळात पोलीस ठाण्यामध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना जाबजबाब घेण्यासाठी नेहमी रुग्णालयाच्या विविध वार्डमध्ये जावे लागते. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे काही पोलीस अधिकारी बाधित आढळून आले होते. तर काही कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील पोलीस ठाण्याततील पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
एप्रिल 2020 महिन्यामध्ये कोरोना वॉर्डनजिक असणाऱया पोलीस ठाण्याचे स्थलांतर जिल्हा रुग्णालयातील अन्य ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्ष कामाला प्रारंभही झाला. मात्र 20 ते 25 दिवस काम केल्यानंतर हळूहळू त्या कामात संथगती येऊ लागली. नंतर तर ते काम अर्धवट ठेवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात सर्व वार्डमध्ये कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी बेडच शिल्लक नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱया वैद्यकीय अधिकारी, नर्सेस यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी कोरोना योद्धा म्हणून खूप चांगली भूमिका बजावली आहे. कोरोना योद्धा म्हणून आणखी बळी द्यायचे नसतील तर सातारा जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने तात्काळ हाती घेतलेल्या नवीन पोलीस ठाण्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.









