शिवसेना जिल्हा कार्यकारिणीचा निर्णय : खासदार विनायक राऊत यांची माहिती
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडीमार्फतच लढविण्याचा निर्णय शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीने घेतल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शरद कृषी भवन येथे झालेल्या शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सतीश सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना संकटामुळे बैठक लांबली होती. शनिवारी शरद कृषी भवन येथे ती घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती खासदार राऊत यांनी दिली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बॅंक आणि जि. प. वर झेंडा फडकविला जाईल. जिल्हा बँक निवडणूक सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली जाणार असल्याचेही स्पष्ट केले. राज्याप्रमाणेच जिल्हय़ातही आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेची सदस्यसंख्या वाढविण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत जिल्हय़ात शिवसेना सदस्यता नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. 2 लाख नवीन सभासद नोंदणी केली जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. कणकवली विकास कुडाळकर, वैभववाडी बळा भिसे, देवगड सुनील दुबळे, कुडाळ संग्राम प्रभूगावकर, मालवण अतुल रावराणे, सावंतवाडी सतीश सावंत, वेंगुर्ले संदेश पारकर, दोडामार्ग जयेंद्र परुळेकर आदींचा समावेश आहे.
कोविडबरोबरच लेप्टो, माकडताप व अन्य साथीच्या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपायायोजनांसाठी शासन व प्रशासन यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जागृती करावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गवासीयांना दिलेला वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द पूर्ण केला आहे. या महाविद्यालयाबाबतचा प्रस्ताव सादर झाल्याचेही राऊत यांनी सांगितले.









