प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी 100 टक्के लसीकरण हे उद्दिष्ट जिल्हा प्रशासन हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिह्यातील सर्व साखर कारखान्याच्या व्यवस्थापनास पत्र पाठवले असून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करणे बंधनकारक केले आहे. जिह्यात नव्याने आढळून आलेल्या 32 बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील 14 नवीन बाधित आढळून आले आहेत. जावली, खटाव, महाबळेश्वर आणि खंडाळा या चार तालुक्यात एक ही नवीन बाधित आढळून आला नाही.
100 टक्के लसीकरणांसाठी प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
जिह्यात 100 टक्के लसीकरण करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा घेत 10 सूचना दिल्या आहेत. पहिल्या डोसचे 85 टक्के तर दुसऱया डोसचे 37 टक्के प्रमाण दिसून आले आहे. दुसऱया डोसची अपेक्षित उद्दिष्ठपूर्ती होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना कामकाजासंबधी सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय कर्मचारी यांच्या कोविड लसीकरणाच्या दुस्रया डोसची मात्रा कोविन पोर्टलद्वारे पडताळणी आवश्यक आहे. 100 टक्के लसीकरणासाठी त्यांनी आदेश दिले आहेत.
जिह्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स यामध्ये काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण बंधनकारक राहील, भरारी पथक तयार करून तपासणी करावी, जेथे लसीकरण केले नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, ज्यांचे लसीकरण पूर्ण आहे अशांना मंदिर, हॉटेल, दुकान येथे प्रवेश देण्यात यावा, अशा सूचनांचा समावेश आहे.
ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी साखर कारखान्यांना पत्र
सातारा जिह्यात कोरोनामुळे 2 लाख 51 हजार 19 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. सध्या जिह्यात विविध साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरु झाला आहे. यासाठी जिह्यामध्ये परजिह्यातून व परराज्यातून ऊसतोड व इतर कामगार आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. कामगारांची आरटीपीसीआर, रॅट टेस्ट करण्यात यावी, लसीकरणाबाबत पडताळणी करण्यात यावी, लसीकरण झाले नसेल तर नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, कामगारांची इतर आरोग्य विषय बाबींसाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिह्यातील साखर कारखान्यांना दिले आहे.
चार तालुक्यातील एक ही रुग्ण नाही
काल दिवसभरात तपासणी केलेल्या 3292 जणांपैकी 32 जण बाधित आढळून आले. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून 562 जण उपचार घेत आहेत. दिवसभरात 21 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तालुका निहाय पुढीलप्रमाणे तर कंसात आतापर्यंत ः-जावली 0(10,035), कराड 2(39,207), खंडाळा 0(14,191), खटाव 0(25,857), कोरेगाव 1(21,919), माण 3(17,959), महाबळेश्वर 0(4711),पाटण 1(10,138), फलटण 4(37,373), सातारा 14(51,950), वाई 6(15,756), इतर 0(21,70), एकूण 32(2,51,266) मृत्यू तालुकानिहाय पुढीलप्रमाणे जावली 0(224), कराड 1(1245), खंडाळा 0(196), खटाव 0(653), कोरेगाव 2(508), माण 0(422), महाबळेश्वर 0(89), पाटण 2(373), फलटण 0(699), सातारा 0(1528), वाई 0(402), इतर 0(89), एकूण 5(6428).









