5-जी नेटवर्कसाठी रिलायन्स-जिओ सज्ज ; वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानींची घोषणा
मुंबई / वृत्तसंस्था
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुरुवारी 5-जी (फाईव्ह-जी) नेटवर्कसंदर्भात मोठी घोषणा केली. 5-जी चाचण्यांमध्ये कंपनीने 1 जीबीपीएस स्पीड प्राप्त केली असून नव्या इंटरनेट जाळय़ाच्या विस्ताराची सर्व तयारी पूर्ण केल्याचे अंबानींनी जाहीर केले. त्याचबरोबर गुगल आणि जिओने संयुक्तपणे विकसित केलेला जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सप्टेंबर महिन्यात बाजारात आणण्याचे सुतोवाचही यावेळी करण्यात आले. तसेच नवी मुंबईमध्ये ‘जिओ इन्स्टिटय़ूट’ साकारण्याची घोषणाही त्यांनी केली.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवारी व्हर्च्युअल माध्यमातून पार पडली. या सभेमध्ये कंपनीच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतल्यानंतर महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्या. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 5-जी नेटवर्कसंबंधी भाष्य करताना सरकारने 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू करताच कंपनीकडून मोठे योगदान दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. देशात अद्याप 5-जी सेवा सुरू करण्यात आली नाही. सप्टेंबरमध्ये 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव सरकारकडून केला जाण्याची शक्मयता आहे.
कोरोनाकाळातही अव्वल कामगिरी
गेल्या 1 वर्षात कंपनीने 75,000 नवीन रोजगार दिल्याचे अंबानींनी एजीएममध्ये सांगितले. रिलायन्स ही खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कस्टम आणि एक्साइज डय़ुटी भरणारी कंपनी आहे. आम्ही देशातील सर्वात मोठे व्यापारी निर्यातदार आहोत. आम्ही देशातील सर्वाधिक जीएसटी, व्हॅट आणि आयकर भरतो असे सांगत आमचा कंझ्युमर बिझनेस खूप वेगवान झाला आहे. रिलायन्स परिवाराने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुकेश अंबानी यांनी कंपनीची ग्रीन एनर्जी योजना जाहीर केली. जामनगरमधील 5,000 एकर जागेवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचा विकास करण्याचे काम सुरू झाले आहे. या व्यवसायात 60,000 कोटींची गुंतवणूक होईल. तसेच यावषी सौदी अरामकोबरोबरचा करार प्रत्यक्षात येईल, अशी आशाही व्यक्त केली.
‘जिओ फोन नेक्स्ट’चे सादरीकरण
‘जिओ फोन नेक्स्ट’ हा नवा फोन गुगल आणि जिओ टीमने विकसित केला आहे. गुगल आणि जिओने संयुक्तपणे ‘जिओ फोन नेक्स्ट’ तयार केला असून हा एक संपूर्ण फिचर स्मार्टफोन आहे. भारत आणि जगभरात सर्वात परवडणारा हा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. हा फोन 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉईड अपडेटसुद्धा या स्मार्टफोनला मिळतील.
गेल्या वषी जुलै महिन्यात गुगलकडून रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. त्यातूनच ‘जिओ फोन नेक्स्ट’ची निर्मिती करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड चांगला असेल, असा दावा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केला आहे. तर मुकेश अंबानी यांनी या हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल अशी स्पष्टोक्ती देत किंमत गुलदस्त्यातच ठेवली आहे.









