प्रतिनिधी/ रत्नागिरी
निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे 22 कोटींपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. त्यामध्ये दापोली व मंडणगड तालुक्यातील शासकीय इमारतींचे सर्वाधिक हानी असून शाळा वर्गखोल्या, अंगणवाडय़ा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. त्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे जि.प.बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. त्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. त्या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या अनेक इमारती, शाळा, आरोग्य केंद्रे यांची नासधुस झाली आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे बनले आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळाही काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दुरूस्ती होणे आवश्यक आहे.
शासनाकडून या दुरुस्तीसाठी विशेष निधी येत नसल्याने जिल्हा नियोजनमधून निधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजनकडे मागणी करण्यात आली असल्याचे सभापती म्हाप यांनी सांगितले आहे. येत्या ऑगस्टमध्ये येणारा गणेशोत्सव लक्षात घेता त्यापूर्वी जि.प.मार्ग तसेच ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे काढुन टाकण्यात यावीत अशा सुचना प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. खड्डेsमय बनलेल्या रस्त्यांच्या ^ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना करण्यात यावी. दुरूस्तीच्या कामाला लागणाऱया अधिकचा निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री अनिल परब व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. कोरोना च्या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हावासियांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य सभापती म्हाप यांनी केले आहे.









