क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीस मान्यता
प्रतिनिधी/ पणजी
राजकीय पक्षांना आता जाहीर सभा घ्यायची असल्यास त्यांनी खुल्या जागेत न घेता बंद सभागृहातच घ्याव्यात व 300 पेक्षा अधिक लोक असू नयेत, असा आदेश भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीहून जारी केला आहे.
आयोगाच्या संयुक्त संचालक अंजू चांडक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे गोव्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता दि. 22 जानेवारी 2022 पर्यंत प्रचार पद्धतीवर कडक निर्बंध असतील, असे त्यात म्हटले आहे.
दि. 22 जानेवारीपर्यंत ‘रोड शो’वर बंदी असेल, पदयात्रा, सायकल – बाईक – कार रॅली होणार नाहीत, जाहीर सभांवर बंदी असेल, सभा किंवा बैठका घ्यायच्याच असतील तर त्या बंद सभागृहात घ्यायला हव्यात. सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के पेक्षा अधिक उपस्थिती असता कामा नये तसेच जास्तीत जास्त 300 लोकांच्या सभेलाच मान्यता असेल असे त्यात म्हटले आहे.
यापूर्वी दि. 8 जानेवारी रोजी कोविड संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. मास्क व सेनिटायझरचा वापर झाला पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.
मतदारांना प्रत्यक्ष भेटणे टाळावे, दो गज की दुरी राखण्यात यावी. दि. 22 जानेवारी नंतर नवीन आचारसंहिता जारी केली जाणार असल्याचे त्यात म्हटले आहे.









