ननवर बलात्काराचा होता आरोप
वृत्तसंस्था / कोट्टायम
नन बलात्कार प्रकरणी न्यायालयाने जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांची निर्दोष मुक्तता केली आहे. केरळच्या कोट्टायममध्ये अतिरिक्त जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी. गोपाकुमार यांनी हा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रँको यांच्यावर बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचे गंभीर गुन्हे ननकडून करण्यात आले होते.
मुलक्कल यांच्याविरोधात न्यायालयात 2019 मध्ये 2 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात लॅपटॉप, मोबाईल आणि वैद्यकीय चाचण्यांसह 30 पुरावे जोडण्यात आले होते. निर्दोष मुक्तता झाल्यावर मुलक्कल यांनी देवाचे आभार मानले आहेत. तर याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ननकडून सांगण्यात आले.
जून 2018 मध्ये केरळच्या ननने रोमन कॅथोलिकच्या जालंधर डायोसिसचे तत्कालीन बिशप प्रँको मुलक्कल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मुलक्कल यांनी कुराविलंगद येथील एका अतिथीगृहात बलात्कार केला, त्यानंतर अन्य अनेक राज्यांमध्ये नेत तेथेही लैंगिक शोषण केले होते. मे 2014 पासून सप्टेंबर 2018 दरम्यान 13 वेळा लैंगिक शोषण करण्यात आल्याचे ननने पोलिसांना सांगितले होते. ननने यासंबंधी चर्च प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली होती. पण कुठलीच कारवाई न झाल्याने पोलिसांकडे तक्रार केली होती.
तपासानंतर 28 जून 2018 रोजी मुलक्कल यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर केरळ पोलिसांनी मुलक्कल यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. कसून चौकशी केल्यावर 21 सप्टेंबर 2018 रोजी मुलक्कलना अटक करण्यात आली होती. केरळ उच्च न्यायालयाने एक महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला होता.
पूर्व बिशप मुलक्कलवर आरोप झाल्यावर पोपनी त्यांना जालंधर डायोसिसवरून हटविले होते. या खटल्याच्या विरोधात मुलक्कलनी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आरोप फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु दोन्ही न्यायालयांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.









