श्रीकृष्णाने जांबवंताला जमिनीवर आपटले तेव्हा त्याला लक्षात आले की आपण ज्याच्याशी लढत आहोत तो कोणी सामान्य दुबळा योद्धा नाही, हा तर चांगलाच बलाढय़ योद्धा दिसतो! त्याने उठून एक प्रचंड वृक्षच उचकटून काढला आणि कृष्णावर प्रहार केला. कृष्णाने तो वृक्ष वरचेवर धरला आणि तो वृक्ष काढून घेऊन त्याने जांबवंतावर उलट प्रहार केला. जांबवंत सावध होता. तो वेगाने मागे सरकला आणि त्याने तो प्रहार वाचवला. मग जांबवंताने एक महाकाय तालवृक्ष मुळासकट उपटून काढला आणि कृष्णावर प्रहार केला. कृष्णाने तो प्रहार त्याच्यावरच उलटवला. त्यामुळे जांबवंत काही क्षण मूर्च्छित पडला. पुन्हा सावरून त्याने दुरूनच कृष्णावर अनेक वृक्ष टाकले. कृष्णाने ते वरच्यावर दूर सारले. त्यांच्यामुळे कृष्णाच्या शरीरावर साधी जखमही झाली नाही. कृष्ण वृक्ष वर्षावाला ऐकत नाही हे पाहिल्यावर रागावलेल्या जांबवंताने रामप्रभूंचे स्मरण करून पत्थरांचा वर्षाव करायला सुरुवात केली.
म्हणे माझिया प्रतापापुढें । न थरे कुंभकर्ण बापुडें ।
म्यां लंकेचे पाडिले हुडे । केलें वेडें मज येणें ।
म्हणोनि टाकी शिळा धोंडी । गगनीं उफाळे दुपांडीं ।
घोष गाजवी ब्रह्मांडीं । दे मुरकुंडी धरावया ।
येरू वृक्षहस्तें करोनी । धोंडी झोडूनि पाडि धरणी ।
आस्वल आंगीं जडतां दुरूनी । वृक्षें लक्षूनि झोडिला
। तो साहोनि वृक्षघात । सवेग उसळला गगनांत ।
विशाळ शीळा घेऊनि त्वरित । निक्षेपित हरिमाथां कृष्णें
मस्तकीं पडतां शिळा । वृक्ष हातींचा विसर्जिला ।
वरच्या वरी धरिली हेळा । तेणें ठोकिला ऋक्षपति।
ऋक्षप मारी जे जे पाषाण । वरच्या वरी ते धरी श्रीकृष्ण ।
तेणें आस्वला करी ताडन । निर्भय पूर्ण स्वस्थानीं ।
प्रथम त्रिरात्र लटापटी । दहा दिवस वृक्षकाठी ।
सप्तरात्र शिळावृष्टि । अंगसंघट्टी याउपरी ।
शिळायुद्धीं नावरे हरि । जाम्बवत क्षोभला भारी ।
मुष्टिघातें हृदयावरी । ताडिला हरि वज्रवत् ।
कृष्णें साहोनि मुष्टिघात । लघुलघवें मारिली लात ।
उलथोन पाडिला जाम्बवत । विचकोनि दांत पद खोडी ।
जांबवंत मनोमन म्हणू लागला-माझ्या पराक्रमापुढे महाबलवान कुंभकर्ण टिकू शकला नाही. लंकेतल्या पराक्रमी राक्षस वीरांना मी लीलया मारले. मग हा मला वेडा करणारा वीर कोण? त्याने विशाळ शिळा कृष्णावर फेकली.
कृष्णाने प्रचंड वृक्षाचा झाडूप्रमाणे उपयोग करून जांबवंताने केलेला शिळा वर्षाव परतवून लावला. डोक्मयावर मोठी शिळा पडताना कृष्णाने हातातला वृक्ष दूर टाकला व शिळा वरचेवर हाताने झेलली. तीच शिळा जांबवंतावर टाकली. असे त्यांचे तुंबळ युद्ध अनेक दिवस रात्री चालूच होते. जांबवंताने रागाने मुष्टीप्रहार केला. तो सहज सहन करून कृष्णाने हळूच एक लाथ जांबवंताला मारली त्याने तो कोलमडून उलथून आपटला. तो दात विचकत रागाने उठला.
आपुला भक्त हें जाणिनि हरि । मदगर्वातें मात्र परिहरी ।
वांचूनि जेवें सहसा न मारी । दैत्यापरी क्षोभोनी ।
Ad. देवदत्त परुळेकर








